उत्तर गडचिरोलीत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले : दोघांना कंठस्ऩान

नक्षलवाद्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी या पत्रकार परिषदेत दिली. सध्या अनेक नक्षलवादी कोरोनामुळे त्रस्त असल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी या चकमकीत राजा मडावी याला ठार केल्याने नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाचे कंबरडे मोडले.
Naksal Gadchiroli
Naksal Gadchiroli

गडचिरोली : धानोरा उपविभागाअंतर्गत (Under Dhanora subdivision) येणाऱ्या पोलिस मदत केंद्र सावरगाव हद्दीतील मोरचूल जंगल (Morchul Forest) परिसरात आज सकाळी ६ ते ६. ३० वाजता दरम्यान पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत (Clashes between police and Naxalites) पोलिसांनी दोन जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. मृतांमध्ये एक पुरुष व एक महिला असून पुरुषाचे नाव राजा उर्फ रामसाई नोहरू  मडावी (Raja alis ramsai noharu Madavi) (वय ३३, रा. मोरचूल, ता. धानोरा) व महिलेचे नाव रनिता उर्फ पुनिता चिपळूराम गावडे (Ranita alis Punita Chiplunrao Gawade) (वय २८, रा. बोटेझरी, ता. धानोरा) असे आहे.

पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी या चकमकीसंदर्भात माहिती दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत माहिती देताना अपर पोलिस अधीक्षक कलवानिया म्हणाले की, सावरगाव जंगल परिसरात घातपात करण्याच्या उद्देशाने नक्षलवादी एकत्र आल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाल्याने अपर पोलिस अधीक्षक मनीष कालवानिया यांच्या मार्गदर्शनात व अपर पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या नेतृत्वात मोरचूल जंगल परिसरात सी-६० कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. 

याच दरम्यान ४५ ते ५० नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनीही स्वसंरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. घनदाट जंगलाचा फायदा घेत नक्षलवादी घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर या ठिकाणी शोध अभियान राबविले असता दोन जहाल नक्षलवादी निपचित पडल्याचे दिसून आले. त्यांना गडचिरोली येथे आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. यातील राजा उर्फ रामसाई नोहरू मडावी हा नक्षलवाद्यांच्या टिपागड एरिया कमिटी प्लाटून क्रमांक १५ च्या कमांडर पदावर कार्यरत होता. त्याच्यावर विविध कायद्यांन्वये ४४ गुन्हे दाखल आहेत. 

सरकारने त्याच्यावर १२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. रनिता उर्फ पुनिता चिपळूराम गावडे ही कसनसूर एलओएसमध्ये सदस्य होती. तिच्यावर विविध कायद्यांन्वये ९ गुन्हे दाखल होते. सरकारने तिच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पोलिसांना घटनास्थळावर एक एसएलआर रायफल, ८ एमएम रायफल, कुकर बॉम्ब व आईडी आदी स्फोटक साहित्य आढळले. तसेच नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापराचे मोठे साहित्यही आढळून आले. याशिवाय या चकमकीत आणखी काही नक्षलवादी जखमी असण्याची शक्‍यता पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली.

नक्षल्यांनाही कोरोना
नक्षलवाद्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी या पत्रकार परिषदेत दिली. सध्या अनेक नक्षलवादी कोरोनामुळे त्रस्त असल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी या चकमकीत राजा मडावी याला ठार केल्याने नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाचे कंबरडे मोडले असून नक्षलवाद्यांचा हा विभाग जवळपास नष्टच होण्याच्या मार्गावर असल्याचे ते म्हणाले. ही लढाई इतक्‍यात संपणार नाही. पण, आम्ही प्राणपणाने लढत राहू आणि नक्षलवाद मुळापासून संपवू, असेही ते म्हणाले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com