नागपूर : समाजासाठी काम करणाऱ्या संतांना विद्रोही संबोधले गेले आहे. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग ‘भले तरी देऊ कासेसी लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’, असेच काहीसे नाना पटोलेंचे काम आहे. त्यांना पटले नाही तेव्हा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करून त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. ‘मी विद्रोही माणूस आहे, हे सर्वांनाच माहिती आहे आणि संत तुकोबांच्या अभंगाप्रमाणे अत्याचारी विचारधारेच्या मोदी सरकारवर माझी काठी चालणार आहे, असे नाना पटोले आज कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
नाना म्हणाले, देशपातळीवर अराजकता माजली आहे. केंद्र सरकारकडून मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे अत्याचारी विचारधारेच्या विरोधात म्हणजेच मोदी सरकारच्या विरोधात माझी काठी चालेल, असे ते म्हणाले. महाविकास आघाडीमधील आमच्या नेत्यांमध्ये समन्वय आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात बोलण्याचा प्रश्नच येत नाही. या देशात आणि राज्यात अत्याचार करणाऱ्यांना माझा विरोध आहे. भाजपच्या मनमानी कारभाराल विरोध आहे, असे नाना म्हणाले. दरम्यान, नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा दिला. आता त्यांच्या नावाची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा झाली आहे. माझ्या पक्षाला राज्यात एक क्रमांकाचा पक्ष कसा बनवता येईल, याकडे मी लक्ष देणार आहे, असेही नाना म्हणाले.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम ठरला आहे. जे ठरलं आहे, त्यानुसार महाविकास आघाडीने चालावे. त्याप्रमाणे कुणी वागले नाहीतर त्यांना समजावून सांगणे माझे काम आहे, असेही नाना म्हणाले. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष पदाची निवडणूक फार लांबवली, पण योग्य व्यक्तीची निवड केली, असा सूर उपराजधानीत उमटत आहे. माझ्या पक्षाला ‘नंबर १’ करण्याकडे कल असेल, असा निर्धार नाना पटोले यांनी आज व्यक्त केला.
Edited By : Atul Mehere

