राज्यात मतपत्रिकेद्वारे मतदान व्हावे, यासाठी नाना पटोले आग्रही ! - nana patole insists that voting should be done through ballot papers in the state | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यात मतपत्रिकेद्वारे मतदान व्हावे, यासाठी नाना पटोले आग्रही !

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

 विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व कायदेशीर बाबींच्या अधीन राहून यासंदर्भात कायदा तयार करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरु करण्यात यावी अशा स्पष्ट सूचना विधी व न्याय विभागाचे सचिव यांना दिल्या.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारेदेखील मतदान करण्याचा पर्याय/सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्‍ट्र विधानमंडळाने कायदा तयार करावा, अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिल्या.

प्रदीप महादेवराव उके, नागपूर यांनी या संदर्भात मा. विधानसभा अध्यक्षांकडे निवेदन तसेच याचिका सादर केली आहे.  त्यासंदर्भात आज दि. 02 फेब्रुवारी, 2021 रोजी विधानभवन, मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री, अमित देशमुख, विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग आणि राज्याचे विधी व न्याय विभागाचे सचिव भुपेंद्र गुरव आदी उपस्थित होते.   

अर्जदारातर्फे ॲड. सतीश उके यांनी यासंदर्भात निवेदनातील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, राज्यातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे मतदान करण्याचा विकल्प मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.  मतपत्रिका अथवा ईव्हीएम कोणते माध्यम अधिक विश्वासार्ह आहे.  हे जनतेला ठरवू दया, यासंदर्भातील जनभावनेची दखल घेऊन कायदा तयार करणे ही विधानमंडळाची जबाबदारी आहे.  ईव्हीएम संदर्भात अनेक मुद्दे उपस्थित झाले असून अद्यापही जनमानसात या ईव्हीएम कार्यप्रणालीबद्दल साशंकता आहे.  यामुळे मतपत्रिका या पारंपरिक मतदान पत्रिकेचा पर्याय देखील मतदारांना उपलब्ध असला पाहिजे असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.  

भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 328 प्रमाणे राज्यातील निवडणुकांच्याबाबत कायदा तयार करण्याचे अधिकार राज्य विधान मंडळाला आहेत.  अनुच्छेद 328 नुसार राज्य विधानमंडळाला असलेल्या अधिकारानुसार आनुषंगिक कायदा तयार करून राज्यातील जनतेला ईव्हीम व्यतिरिक्त मतपत्रिकेने मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा.  यानुसार इच्छेनुरुप, मतदार हे  ईव्हीएम किंवा मतपत्रिकाव्दारे मतदानाचा हक्क बजावू शकतील. सबब, मतदानानुसार झालेली निवडणूक आणि निकाल, एकंदरीत सर्व प्रक्रिया यावरील आम जनतेचा विश्वास आणखी दृढ होईल आणि मतदानाची टक्केवारी देखील वाढेल. 

बैठकीत झालेल्या चर्चेत उपस्थितांनी विविध मुद्यांचा परामर्ष घेतला. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी जगातील अनेक प्रगत देशांनी ईव्हीएम ला नाकारले आहे याकडे यावेळी लक्ष वेधले. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व कायदेशीर बाबींच्या अधीन राहून यासंदर्भात कायदा तयार करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरु करण्यात यावी अशा स्पष्ट सूचना विधी व न्याय विभागाचे सचिव यांना दिल्या.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख