मोदींनी ‘चाय पे चर्चा’ केलेल्या जिल्ह्यात आझाद मैदानावर होणार टीकैतांची सभा - a meeting of tikait at azad maidan in the district where modi had tea party discussion | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींनी ‘चाय पे चर्चा’ केलेल्या जिल्ह्यात आझाद मैदानावर होणार टीकैतांची सभा

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

केन्द्र सरकारने पारीत केलेल्या काळया कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. आता हेच आंदोलन देशभर पेटविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या आंदोलनाची सुरुवात यवतमाळातून होत आहे. यवतमाळात सभा व्हावी, यासाठी राकेश टिकैत यांनी होकार दिला आहे.

नागपूर : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील दाभडी येथे ‘चाय पे चर्चा’ केली होती. देशाचा चेहरामोहरा बदलविण्याची भाषा केली होती. पण देशाचा तर दूरच त्या दाभडीचीही स्थिती मोदी बदलू शकले नाहीत. त्यामुळे दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले आंदोलन देशभर फैलवण्यासाठी शेतकरी नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याची सुरूवात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातून करण्यात येणार आहे. या सभेला शेतकरी नेते राकेश टिकैत येणार असून महाराष्ट्रातील ही त्यांची पहिलीच सभा असणार आहे, अशी माहिती सिकंदर शहा यांनी दिली.

केन्द्र सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित पारीत केलेल्या तीन कायद्यांविरोधात देशभर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. हे कायदे व्यापारी धार्जिणे असून त्यामुळे शेतक-यांची प्रचंड लूट होणार आहे. दरम्यान हे तुघलकी कृषी कायदे परत घेण्यासाठी तसेच केन्द्र सरकारविरुद्ध बिगुल फुंकण्यासाठी यवतमाळात शेतकरी नेते राकेश टिकैत यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता येथील आझाद मैदानात ही सभा होणार आहे. 

या कृषी कायद्यांमुळे किमान आधारभूत किमतीचे संरक्षण संपुष्टात येण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग संभ्रमात सापडला आहे. या नवीन कायद्यांच्या माध्यमातून शेतीचे व्यापारीकरण करण्यात आले आहे. करार शेतीमुळे गरीब, हतबल शेतकरी आणखी गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. केन्द्र सरकारचे कायदे येण्यापूर्वी मोठमोठे वेअर हाऊस बांधणे सुरू झाले आहे. शेतक-यांसोबत शेतीचा करार करायचा, चांगले उत्पन्न घ्यायचे आणि शेतक-यांची मात्र कमी भावात बोळवण करायची, असा गोरखधंदा सुरू होणार आहे. व्यापारी हे व्यापार करण्यात हुशार असतात. त्यामुळे त्यांच्याकडून शेतक-यांबद्दल आत्मीयतेची भावना जागृत होण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. या व्यापारीकरणात शेतक-यांचा शेतीव्यवसाय संपुष्टात येईल. हक्काचे व्यासपीठ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या सुध्दा संपुष्टात येतील. त्यामुळे व्यापा-यांची एकाधिकारशाही सुरू होईल अशी भिती सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान केन्द्र सरकारने हे काळे कायदे परत घ्यावे, यासाठी दिल्ली येथे गेल्या दोन महिन्यांपासून शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. आता हे आंदोलन देशभरात सुरू करण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे. त्या अनुषंगाने यवतमाळ येथे आझाद मैदानात 20 फेब्रुवारीला शेतकरी नेते राकेश टिकैत यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी कालच जिल्हयातील शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली. 

बैठकीला शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा, स्वामिनी स्ंघटनेचे महेश पवार, स्वाभिमानी पक्षाचे मनिष जाधव, राजू पाटील भोयर, विलास पाटील चोपडे, गुलाब चव्हाण, अविनाश घनवट, नरेश पुनसे, राम ढोबळे, अशोक शिर्के, राजू गावंडे, संतोष ढवळे, गिरीष चौधरी माजी सरपंच, खालीक शेख, श्रीकांत कापसे, विजय कदम, अनुप चव्हाण, विजय ढाले, सचिन येरमे, विष्णू राठोड, यशवंत इंगोले, मधुकर प्रधान, उत्तम गुल्हाने, बिशनसिंग शिध्दु, प्रकाश बुटले, गौतम रणवीर, गणपत गव्हाळे तसेच इतर विविध शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.  

यवतमाळातून आंदोलनाला सुरुवात
केन्द्र सरकारने पारीत केलेल्या काळया कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. आता हेच आंदोलन देशभर पेटविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या आंदोलनाची सुरुवात यवतमाळातून होत आहे. यवतमाळात सभा व्हावी, यासाठी राकेश टिकैत यांनी होकार दिला आहे. जिल्हाभरातील शेतकरी तसेच नागरिकांनी या सभेला उपस्थित राहणे गरजेचे आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख