नागपूर : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेला वीज जोडणी कापण्याची धमकी दिली होती. ऊर्जामंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे १०० युनिट वीज तर माफ केलीच नाही. उलट आता जोडण्या कापणे सुरू केले आहे. कुणाच्याही घरी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी वीज जोडणी कापायला आल्यास, त्यांनी आम्हाला कळवावे, असे आवाहन राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील जनतेला रस्त्यावर उतरावे लागले. स्वतः केलेली घोषणा पूर्ण करू शकत नाही, हे कसले सरकार, असा प्रश्न उपस्थित करून बावनकुळे म्हणाले, या सरकारने मागील वर्षी मार्च महिन्यात लोकप्रिय घोषणा केली होती की १०० युनिटचे वीज बिल प्रतिग्राहक माफ करू. त्या गोष्टीला आता वर्ष होत आले आहे. त्यामुळे सरकारने आता १२०० युनिट प्रतिग्राहक माफ केले पाहिजे. आपल्याच घोषणेवरून पलटलेल्या सरकारने कोरोनाच्या काळात अव्वाच्या सव्वा बिले जनतेला दिली. एका सामान्य घराला ४० हजार रुपयांपर्यंतचे बिल पाठविण्यात आले. सरकारचं हे वागणं बरं नव्हं. आता वीज जोडणी कापयलाही सुरूवात केली आहे.
आमच्या सरकारच्या काळात ४५ लाख शेतकऱ्यांना ५ वर्ष मोफत वीज दिली. एक पैसाही त्यांच्याकडून घेतला नाही. आता या सरकारने ७२ लाख कुटुंबांची वीज कापण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ७२ लाख घरांची वीज कापणे म्हणजे जवळपास ४ कोटी लोकांना अंधारात ठेवणे आहे. आमचे १०० युनिट वीज बिल माफ करा, असे म्हणायला लोक सरकारकडे गेले नव्हते. सरकारने स्वतःहून लोकप्रिय होण्यासाठी घोषणा केली होती. आता वेळ आली आहे की, सरकारने ती पूर्ण केली पाहिजे. पण सरकार मोगलशाही करत आहे. वीज कापणे त्वरीत थांबवावे, अन्यथा आक्रोश आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांच्या आपसी लढाईत जनतेला नाहक त्रास दिला जात आहे. घोषणेचे श्रेय ज्यांना घ्यायचे आहे, त्यांनी घ्यावे. पण आता जनतेला आणखी वेठीस धरू नये, अशी मागणी त्यांनी केली. ज्या लोकांनी मते देऊन या सरकारला निवडून दिले, त्या लोकांबद्दल सरकारच्या मनात कुठलीही दया नाही. वीज बिलांचा प्रश्न सोडविण्यासाठी फक्त ५ हजार कोटी रुपये लागतात. सरकारने बजेटमध्ये ५ हजार कोटी रुपये काढावे, तेही शक्य नसेल, तर कर्ज काढावे. कारण जनतेच्या भल्यासाठी कर्ज काढणे वाईट नाही. पण आता जनतेचा अंत बघू नये, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Edited By : Atul Mehere

