दिल्लीतून कुणालाही येऊ दे, हे सरकार पडणे नाही… - let anyone come from delhi this government will not fall | Politics Marathi News - Sarkarnama

दिल्लीतून कुणालाही येऊ दे, हे सरकार पडणे नाही…

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

आमचे सरकार साखर कारखानदारांना त्रास देत आहे, असे वक्तव्य अमित शहा यांनी केले. यावर काय सांगाल, असा प्रश्‍न अजितदादांना केला असता, ‘तुम्हाला तरी हे पटतं का हो...’, असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला.

नागपूर : महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधी पक्षातील लोक सांगायचे की, तीन महिन्यांत हे सरकार पडेल. मग म्हणाले सहा महिने, मग नऊ महिने, आता तेसुद्धा थकलेत. पण त्यांच्या म्हटल्याने सरकार पडणार नाही. त्यामुळे कितीही ऑपरेशन लोटस करू द्या आणि दिल्लीतून कुणालाही येथे येऊ द्या, हे सरकार पडणे नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे ठामपणे सांगितले.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्या पायगुणाने महाविकास आघाडी सरकार पडेल, असे वक्तव्य भाजप नेते नारायण राणे यांनी नुकतेच केले होते. त्यांना अजित पवार यांनी आज सडेतोड उत्तर दिले आहे. तर नारायण राणेंचे हे वक्तव्य म्हणजे राजकारणातील विनोद आहे, असे म्हणत राणेंच्या वक्तव्याला महत्व देण्याची गरज नाही, असे शरद पवारांनी आजच दाखवून दिले होते. 

कॉंग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनावर घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली आहे. या तीन प्रमुख नेत्यांचा आशीर्वाद सरकारला लाभला आहे. त्यामुळे त्यांना स्वप्न बघू द्या, अशी कोटी अजित पवारांनी केली. शरद पवारांचे कामगारापासून उद्योगपतींपर्यंत सर्वांशी चांगले संबंध आहेत. एक शेतकरी त्यांना भेटू शकतो, तर एखादा उद्योगपतीही त्यांना भेटू शकतो. त्यामुळे एखाद्या उद्योगपतीने त्यांची भेट घेतली, म्हणून एखाद्या निर्णयावरून ते फिरतील, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे, असेही पवार म्हणाले. 

तुम्हाला तरी पटतं का हो...
आमचे सरकार साखर कारखानदारांना त्रास देत आहे, असे वक्तव्य अमित शहा यांनी केले. यावर काय सांगाल, असा प्रश्‍न अजितदादांना केला असता, ‘तुम्हाला तरी हे पटतं का हो...’, असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला. ते म्हणाले, आम्ही स्वतः साखर कारखानदारीशी संबंधित लोक आहोत. जयंत पाटलांचे चार कारखाने, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांचेही साखर कारखाने आहेत, आणखी किती उदाहरण देऊ, असे सांगताना त्या प्रश्‍नावर मिश्‍कील हसत त्यांनी पुढील प्रश्‍नाचा इशारा केला.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख