जयंत पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्रीपदाबाबत आधीच ठरलेले... - jayant patil said already decided on the post of deputy chief minister | Politics Marathi News - Sarkarnama

जयंत पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्रीपदाबाबत आधीच ठरलेले...

चेतन देशमुख
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

अनेक हजार कोटी थकले आहेत. कोरोनाच्या काळातील वीजबिलाचा मुद्दा आहे. त्यासंदर्भात ऊर्जामंत्री योग्य निर्णय घेतील. थकबाकीमुळे महावितरणची स्थिती अडचणीची झाली आहे.

यवतमाळ : महाविकास आघाडी स्थापन करताना पदवाटपाबाबत तिन्ही पक्षांची सखोल चर्चा झालेली आहे. उपमुख्यमंत्रीपदाचाही त्यात समावेश होता. काँग्रेसकडून अद्याप तशी मागणी आलेली नाही. विधानसभा अध्यक्षपद मोकळे झाले असून, त्यावर चर्चा होईल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमानिमित्त यवतमाळला आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, निरीक्षक किशोर माथनकर, माजी आमदार संदीप बाजोरीया उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी करताना सर्वच विषयांवर चर्चा झाली आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे गेले होते. सध्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झाले. त्यामुळे त्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र येऊन निर्णय घेतील. भाजपच्या काळात राज्याची आर्थिक स्थिती अडचणीची झाली आहे.

अनेक हजार कोटी थकले आहेत. कोरोनाच्या काळातील वीजबिलाचा मुद्दा आहे. त्यासंदर्भात ऊर्जामंत्री योग्य निर्णय घेतील. थकबाकीमुळे महावितरणची स्थिती अडचणीची झाली आहे. यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही जयंत पाटील म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी सुरू होत आहे. त्यात राज्य सरकारने आपली भूमिका मांडली आहे. कोणत्याही समाजाचे हक्काचे आरक्षण शासन कमी करणार नसल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

अन्नदात्याला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न
दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. शेतकरी आत येऊ नयेत, म्हणून त्यांच्या मार्गावर खिळे ठोकले जात आहेत. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. एवढीच सुरक्षा पाकिस्तान व चीनच्या सीमेवर केली असती, तर देश आणखी सुरक्षित झाला असता. केंद्र शासन ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे, ते अत्यंत चुकीचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख