संघटनेला वेळ देणाऱ्यांनाच यापुढे पद, जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले...  - jayant patil pierced the ears of officers bearers only for those who gave time to organization | Politics Marathi News - Sarkarnama

संघटनेला वेळ देणाऱ्यांनाच यापुढे पद, जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले... 

चेतन देशमुख
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती काही दिवसांपूर्वीच झाल्याचे चर्चेतून पुढे आले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या. या सर्व चर्चेतून जिल्ह्यातील स्थिती प्रदेशाध्यक्षांसमोर आली. त्यामुळे केवळ ‘शोबाज’ म्हणून पुढे मिळविणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कान टोचले.

यवतमाळ : जिल्ह्यातील पक्षाचा आढावा घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर अनेक विषय आले. जिल्ह्यात संघटन कमकुवत झालेले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले. याशिवाय, यापुढे संघटनेला पूर्ण वेळ देऊन संघटन मजबूत करणाऱ्यांनाच पदे दिले जातील, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला. 

माजी आमदार संदीप बाजोरीया यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज पक्षाच्या कार्याचा आढावा घेताना प्रदेशाध्यक्ष पाटील बोलत होते. यावेळी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार इंद्रनील नाईक, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रदेश उपाध्यक्ष संदीप बाजोरीया, जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष पाटील राष्ट्रवादी परिवार संवादाच्या निमित्ताने विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत आहेत. संघटनेत कधीपासून आहात, संघटनेतील योगदान व संघटन वाढीसाठी केलेले प्रयत्न, संघटनेची स्थिती याबाबत सविस्तर माहिती पदाधिकाऱ्यांकडूनच त्यांनी घेतली. 

अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती काही दिवसांपूर्वीच झाल्याचे चर्चेतून पुढे आले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या. या सर्व चर्चेतून जिल्ह्यातील स्थिती प्रदेशाध्यक्षांसमोर आली. त्यामुळे केवळ ‘शोबाज’ म्हणून पुढे मिळविणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कान टोचले. यापुढे अशी स्थिती सहन केली जाणार नाही. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी जो वेळ देईल व कार्यकर्त्यांना सन्मान देईल, त्यांनाच पदे दिले जातील, असा इशाराही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी अप्रत्यक्षपणे कुणाचेही नाव न घेता दिला. तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी यवतमाळ व राळेगाव विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यावेळी नाना गाडबैले, पांडुरंग खांदवे, जिल्हा परिषदेचे सदस्य निमिष मानकर, युवकचे जिल्हाध्यक्ष आशिष मानकर, पंकज मुंदे, दीपक धात्रक, साजिद शेख, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रितीश बोबडे, शेखर सरकटे, मनीषा काटे आदी उपस्थित होते. संचालन प्रा. वर्षा निकम यांनी केले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख