जयंत पाटलांनी विचारले की, काॅंग्रेसचे आमदार अन्याय तर करत नाही ना ? - jayant patil asked is not the congress mla doing injustice | Politics Marathi News - Sarkarnama

जयंत पाटलांनी विचारले की, काॅंग्रेसचे आमदार अन्याय तर करत नाही ना ?

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

महाविकास आघाडी सरकारमधील सहभागी पक्षांच्या नेत्यांच्या कुरबुरी अधूनमधून बाहेर येतच असतात. त्यात जयंत पाटलांच्या काल केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण होतो की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.  

नागपूर : राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरीतून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची सुरुवात केली. या यात्रेच्या पाचव्या दिवशी काल शेवटची बैठक त्यांनी नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा येथे घेतली. येथे आमदार कॉंग्रेसचे आहेत. आमदार तुम्हाला सोबत घेऊन काम करतात की नाही, आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय तर होत नाही, अशी विचारणा त्यांनी कार्यकर्त्यांना केली. 

महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेसचे नेते व राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनी केदार सावनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. आमदारांकडून आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय तर होत नाही ना, याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी म्हटले. तसे ट्विटही राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काल केले गेले. जयंत पाटलांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना कार्यकर्ते भरभरून बोलले. त्याहीपेक्षा जास्त चर्चा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटची रंगली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील सहभागी पक्षांच्या नेत्यांच्या कुरबुरी अधूनमधून बाहेर येतच असतात. त्यात जयंत पाटलांच्या काल केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण होतो की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.  

खापरखेडा येथे काल झालेल्या बैठकीला माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार प्रकाश गजभिये, नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमर जैन, सावनेर विधानसभा अध्यक्ष किशोर चौधरी, अफसर खान, कपिल वानखेडे, रामू बैतुले, जितेंद्र पानतावने, विनोद गोडबोले, देवानंद मगरे, विनोद कोथरे  यांनी केले होते. 

सावनेरवर वर्चस्व कुणाचे ?
सावनेर नगर परिषदेवर सध्या भाजप आणि रासपची सत्ता आहे. अध्यक्ष भाजपच्या रेखा मोहाडे, तर उपाध्यक्ष रासपचे अरविंद लोधी आहेत. पुढील वर्षी नगर परिषदेची निवडणूक आहे. नगर परिषदेवर कॉंग्रेसची एकहाती सत्ता असावी, यासाठी स्थानिक आमदार आतापासून जोर लावून आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख उपाध्यक्ष अरविंद लोधी यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादी कॉंग्रेस येथे खाते उघडण्याच्या मनःस्थितीत असल्याचे दिसतेय. कृषी उत्पन्न बाजार समितीपासून वाघोडा रस्ता गेला आहे. त्याबाबत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार समाधानी नसल्याची माहिती आहे. नवीन डीपी प्लान तयार करण्याची तयारी त्यांनी चालविली आहे. त्यासाठी नगरपरिषदेवर सत्ता बळकावण्यासाठी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन्ही पक्षांचे नेते सरसावले आहेत. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख