नागपूर : शासकीय रुग्णालय म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती अस्वच्छता, दुर्गंधी, खाटांअभावी कुठेही झोपलेले रुग्ण, रुग्णालयाच्या आवारात नातेवाइकांची गर्दी, कलकलाट, गोंधळ. त्यामुळेच अनेक जण शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी धजावत नाहीत. पण आदिवासी आणि नक्सल प्रभावित गडचिरोलीतील शासकीय रुग्णालय बघितले तर आपला आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. हा सरकारी दवाखाना आहे की पंचतारांकित हॉटेल, अशीच प्रतिक्रिया व्यक्त होते. ही किमया साधली आहे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आणि या रुग्णालयाचा व्हिडिओ तुकाराम मुंढे यांनी ट्विट केला आहे.
नागपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून गडचिरोली जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ १.५३ मिनिटांचा असून एका पंचतारांकित रुग्णालयासारखा दिसतो. परंतु, हा व्हिडिओ हॉटेलचा नसून रुग्णालयाचा आहे, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. व्हिडिओत दिसणाऱ्या रुग्णालयाची स्वच्छता, मल्टीस्पेशालिटी सुविधा आणि सुशोभीकरण हे भुरळ घालणारे आहे. खासगी रुग्णालयांनाही मागे टाकेल, असे हे रुग्णालय आहे.
Believe it, it’s Government Hospital, Gadchiroli. Inspirational work ! Great work@DeepakSingla161, to transform District Hospital , Gadchiroli. Team Gadchiroli pic.twitter.com/3tsiM3Vexa
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) February 8, 2021
दीपक सिंगला यांनी केलेल्या कामाचा परिचय
गडचिरोलीतील हे सरकारी रुग्णालय राज्यातील सर्वच जिल्ह्यांसाठी रोल मॉडेल ठरू शकते. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केलेल्या कामाचा हा परिचय आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ज्याप्रकारे शाळांचा कायापालट केला. त्याचप्रमाणे दीपक सिंगला यांनी रुग्णालयाचे रूप बदलले. सरकारी रुग्णालय कसे असावे, हे दर्शवणारा हा व्हिडिओ आहे. या कामासाठी गडचिरोलीच्या टीमचे तुकाराम मुंढे यांनी कौतुक केले आहे.
सरकारी काम अन् सहा महिने थांब, असं म्हटलं जाते. यामुळेच लोकांना शासकीय कार्यालये कंटाळवाणी वाटतात. हीच स्थिती शासकीय रुग्णालयांची झाली आहे. रुग्ण बरा होईल तेव्हा होईल; पण, रुग्णालयाची स्थिती पाहून आपण बरेच होणार नाही, असे मात्र रुग्णाच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. मात्र, याला अपवाद असलेले रुग्णालय विदर्भात तयार करण्यात आले आहे. सरकारी रुग्णालय म्हटले की घाणेरडे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. रुग्णालयाच्या आजूबाजूला कचऱ्याचा ढीग, दुर्गंधी, डॉक्टर जागेवर नाही असेच काहीसे चित्र पहिल्या नजरेत बघायला मिळते. रुग्णालयाची दुरवस्था आणि रुग्णांच्या नातेवाइकांना होणाऱ्या मनःस्तापामुळे अनेक जण शासकीय रुग्णालयात जाणे टाळतात.
शासकीय रुग्णालयात उपचार मोफत किंवा कमी किमतीत होतो. तसेच औषधही मिळतात. तरी रुग्ण शासकीय रुग्णालयात जाण्याऐवजी खासगी रुग्णालयांना अधिक प्राधान्य देतात. खासगी रुग्णालय पाहताच मन प्रसन्न होते. मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची सेवा चांगली असते. यामुळे घरच्यासारखं वातावरण असल्याचे जाणवते. मात्र, या रुग्णालयात दाखल होण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते.
मात्र, अशीच सुविधा, साफसफाई, चांगला परिसर शासकीय रुग्णालयात मिळाले, तर तुम्ही कोणत्या रुग्णालयात जाऊ असाच काहीसा विचार कराल. किंवा असं कसं शक्य आहे, असंच काही म्हणाल. मात्र, हे अशक्य वाटणार काम विदर्भातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील एका रुग्णालयाने करून दाखवलं आहे.
मुंढेंचे विदर्भावरील प्रेम कायम
नागपूर मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची येथून गेल्या वर्षीच बदली झाली. मात्र, त्यांचे विदर्भावरील प्रेम काही कमी झालेले नाही. ते नागपुरात असताना अनेक कठोर निर्णय त्यांनी घेतले. यामुळे त्यांना मोठा विरोधही झाला. राजकीय नेत्यांशी त्यांचा वादही झाला. मात्र, त्यांनी आपल्या कामाच्या पद्धतीत काही बदल केला नाही. यामुळेच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. मात्र, त्यांचे विदर्भावरील प्रेम काही कमी झाल्याचे दिसत नाही.
Edited By : Atul Mehere

