अमरावती : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना असे खूष करून टाकले की त्यांच्या वाक्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजविल्या.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील संवाद यात्रा मोर्शी येथे असताना अनिल देशमुख यांनी जोरदार भाषण केले. कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा, पोलिस भरतीसाठी मदत केंद्र स्थापन करणे या मुद्यांसकट त्यांनी महिलांवरी अत्याचार रोखण्यासाठी सरकार शक्ती कायदा आणत असल्याचे त्यांनी सांगितले. याच वेळी काही महिला या पुरूषांनाही त्रास देत असल्याचा उल्लेख त्यांनी या वेळी बोलताना केला.
``महिलांवर क्रूरपणे अत्याचाराच्या घटना होतात. अशा घटनांतील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होणे, न्यायालयाने 45 दिवसात निकाल लावला पाहिजे, काही क्रूर घटनांत फाशीची देखील तरतूद यात करण्यात आली आहे. याबाबत 21 सर्वपक्षीय आमदारांच्या समितीच्या सात बैठका झाल्या आहेत. ते प्रारूप मंजूर झाले की ते मंत्रीमंडळापुढे आणू, असे त्यांनी स्पष्ट केले. काहीकाही ठिकाणी महिला देखील चुकीच्या तक्रारी पुऱूषांना अडचणीत आणतात. त्यांची बदनामी करतात. अशा महिलांनाही शिक्षा करण्याची तरतूद आहे,`` त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या.
व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मेहबूब शेख यांच्या प्रकरणाचा उल्लेख केला. मेहबूब शेख यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचा आयुष्यभरात कधी संबंध आला नसतानाही मेहबूब शेखच्या बदनामीचा प्रयत्न केला. ती तरुणी काळी की गोरी हे पण मेहबूबने पाहिले नसताना तक्रार झाली. अशा प्रकरणांत शिक्षेची तरतूद मेहबूबभाई यात आहे, असा नामोल्लेख देशमुख यांनी करताच पुन्हा हशा पिकला. त्यानंतर त्यांनी सहा महिने शिक्षा आणि एक लाख रुपयांचा दंड अशी तरतूद त्यासाठी सध्या केली असल्याचे सांगितले. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातही अशी तक्रार नुकतीच झाली होती. संबंधित तरुणीने ती तक्रार मागे घेतल्याने ते प्रकरण थांबले.

