यवतमाळ : राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान यवतमाळमध्ये १२ बालकांना पोलिओचा डोस म्हणून सॅनिटायझर पाजण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्व बालकांची प्रकृती बिघडल्याने त्यांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी डॉक्टर, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकेला तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे. दरम्यान, आशा सेविकेने डॉक्टरांवर ठपका ठेवला आहे.
यवतमाळा जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील कापसी (कोपरी) येथे पोलिओ लसीकरणादरम्यान १२ लहान मुलांना पोलिओचा डोस म्हणून सॅनिटायझर पाजण्यात आले होते. या घटनेची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी गंभीर दखल घेतली. चोवीस तासांच्या आत जनसमुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका या तिघांनाही डॉ. पांचाळ यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे. तसेच, दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
जनसमुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गावंडे, आशा सेविका संगीता मसराम, अंगणवाडी सेविका यांना बडतर्फ करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मसराम, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मनवर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून खुलासा आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
दरम्यान, आशा सेविका संगीताने या प्रकरणी डॉक्टरांना दोषी ठरवलं आहे. तिनं म्हटलं आहे की, मी गेल्या दहा वर्षांपासून हे काम करीत आहे. आपण पोलिओ डोसऐवजी सॅनिटायझर देत आहोत हे मी डॉक्टरांना सांगितलं होतं. त्यांना वारंवार मी याची आठवण करुन दिली पण त्यांनी माझं ऐकलं नाही. आता मला बडतर्फ केलं आहे. माझा काय गुन्हा आहे. डॉक्टरांनी सांगतिलं तसं मी केलं.
जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी रुग्णालयाला भेट देऊन या बालकांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. तसेच, परिस्थितीचा आढावा घेऊन आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम काल झाली. घाटंजी तालुक्यातील कापसी (कोपरी) येथे १२ बालकांना पोलिओचा डोस पाजण्याऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आले. ही सर्व बालके १ ते ५ या वयोगटातील आहेत. मुलांना उलट्यांचा त्रास झाल्याने पालकांच्या लक्षात ही बाब आली. त्यामुळे 31 जानेवारीला रात्रीच १२ बालकांना यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले की, पोलिओ लस समजून मुलांना सॅनिटाझर पाजण्यात आल्याचे आरोग्य केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी काही वेळाने सर्व मुलांना पोलिओची लस दिली. घटना घडल्यानंतर उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आलेली नव्हती.
Edited by Sanjay Jadhav

