नागपूर : राज्यातील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष २०२४ च्या निवडणुकीसाठी आत्तापासून तयारीला लागले आहेत. जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा विदर्भातून सुरू केली. त्यांचा विदर्भ दौरा आटोपतो न आटोपतो तोच कॉंग्रेसने नाना पटोले यांच्या रूपात प्रदेशाध्यक्षपद विदर्भाला दिले. त्यामुळे आता कॉग्रेस का हाथ, विदर्भ के साथ, असे काहीसे वातावरण तयार झाले आहे.
विदर्भपुत्र, भंडारा जिल्ह्याच्या साकोलीचे आमदार नाना पटोले यांच्या गळ्यात काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातली. गेल्या महिन्यात प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी यवतमाळच्या संध्या सव्वालाखे यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेसने दोन्ही महत्त्वाची पदे विदर्भाला का दिली, असा प्रश्न नक्कीच सर्वांना पडला असेल. त्यासाठी मात्र आधी विदर्भानं काँग्रेसला काय दिलं? हे पाहावे लागणार आहे.
विदर्भानं काँग्रेसला काय दिलं? -
संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होताच काँग्रेसचे पहिले प्रदेशाध्यक्ष आबासाहेब खेडकर हे होते. तसेच आतापर्यंत विदर्भाने चार मुख्यमंत्री राज्याला दिले. त्यांपैकी तीन मुख्यमंत्री हे काँग्रेसचेच होते. मारोतराव कन्नमवार (नोव्हेंबर १९६२ ते नोव्हेंबर १९६३), वसंतराव नाईक (डिसेंबर १९६३ ते फेब्रुवारी १९७५) आणि सुधाकरराव नाईक (जून १९९१ ते फेब्रुवारी १९९३)या तिन्ही काँग्रेसच्या नेत्यांना विदर्भातील जनतेनं मुख्यमंत्रिपदी बसविले. यांच्या काळात काँग्रेसने विदर्भात आपली पाळेमुळे घट्ट केली. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत २०१४ चा अपवाद वगळता विदर्भाने काँग्रेसलाच साथ दिली आहे. विदर्भामुळे राज्यात काँग्रेसची सत्ता येते, मात्र दुय्यम पदे दिली जातात. विकास निधी पुरेशा प्रमाणात दिला जात नाही, अशी भावना मध्यंतरी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. स्वतंत्र विदर्भाची चळवळसुद्धा याचमुळे फोफावली होती. वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून अनुशेषाचे तज्ज्ञ मामा किंमतकर सातत्याने आकडेवारी जाहीर करून विदर्भावरच्या अन्यायाला वाचा फोडत होते. त्याचा परिणाम झाला. २०१४ च्या काळात काँग्रेसने विदर्भाकडे दुर्लक्ष केल्यामुळे विदर्भातील जनतेनेही दुर्लक्ष केले. तरीही विदर्भाने काँग्रेसचे १० आमदार निवडून दिले होते. काँग्रेस जेव्हा जेव्हा अडचणीत सापडली तेव्हा विदर्भानेच पक्षाला भक्कम साथ दिली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण भारतात काँग्रेसचा सुफडा साफ झाला होता. महाराष्ट्रासारखे मोठे राज्य काँग्रेसने गमाविले होते. त्यातही विदर्भाने काँग्रेसची लाज राखली. संपूर्ण महाराष्ट्रातून खासदार बाळू धानोरकरांच्या रुपात काँग्रेसचा एक खासदार विदर्भातील जनतेने निवडून दिला. गेल्या २०१४ च्या निवडणुकीत देखील मोदी लाटेत महाराष्ट्रात भाजपने झेंडा फडकाविला होता. त्यातही विदर्भाने १० जागा काँग्रेसला दिल्या होत्या.
आणीबाणीनंतरही विदर्भानं दिलं होतं काँग्रेसला बळ -
इंदिरा गांधींच्या काळात देशात आणीबाणी घोषित करण्यात आली होती. त्यावेळी देशात काँग्रेसविरोधात वातावरण तयार झाले होते. त्यानंतर लोकसभेची निवडणूक जाहीर तर झाली, मात्र काँग्रेस निवडून येणार नाही हे त्यावेळी होणाऱ्या विरोधावरून वाटत होते. पश्चिम महाराष्ट्रात इंदिरा गांधींविरोधात वातावरण होते. त्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस टिकू शकणार नाही, असेही वाटत होते. मात्र, त्या काळातही विदर्भ इंदिरा गांधींच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला. विदर्भातून काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आले आणि काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत आपला गड राखला.
विधानसभा निवडणूक २०१९ -
२०१४ च्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत काँग्रेसला चांगलाच धक्का दिला होता. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुफडा-साफ झाला होता. त्यात विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस कुठेच दिसणार नाही, असे बोलले जात होते. आपण कुठेही टिकणार नाही, अशी भावनाही काँग्रेस नेत्यांमध्ये निर्माण झाल्याची चर्चा होती. त्यानुसार विदर्भ वगळता राज्यात काँग्रेसला पाहिजे तशी साथ मिळाली नसली, तरी विदर्भाने काँग्रेसचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला होता. विदर्भातील जनतेने सर्वाधिक १५ जागांवर काँग्रेसला मताधिक्य दिले होते. त्याचाच फायदा म्हणून की काय काँग्रेसनेही यशोमती ठाकूर, डॉ. नितीन राऊत आणि सुनील केदार यांच्या स्वरूपात विदर्भाच्या वाट्याला ३ कॅबिनेट मंत्रिपद दिले. तसेच नाना पटोलेंच्या स्वरूपात विधानसभा अध्यक्षपदही विदर्भाच्या वाट्याला आले होते. त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीतही विदर्भाच्या जनतेने भाजपला डावलून काँग्रेसच्या उमेदवारांना पसंती दिली. त्यामुळे आता विदर्भाशिवाय उभारी घेणे शक्य नाही, असे काँग्रेसला कदाचित उमगले असावे. त्यामुळे त्यांनी विदर्भाला पसंती देत दोन्ही पदे विदर्भाच्या पारड्यात टाकली.
यापूर्वीही दोन्ही पदे होती विदर्भाच्या वाट्याला -
राज्यभर दांडगा जनसंपर्क करू शकणाऱ्या नेत्याला या पदावर विराजमान करणार असल्याच्या चर्चा होत्या. प्रदेश काँग्रेसची दोन पदे विदर्भाला मिळणार नाही, असेही बोलले जात होते. यापूर्वी काँग्रेसने असा प्रयोग केलेला आहे. अशोक चव्हाणांच्या आधी माणिकराव ठाकरे प्रदेशाध्यक्ष होते. त्यावेळी चारुलता टोकस या महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष होत्या. त्या काळात काँग्रेसने विदर्भात आणखी आपली पकड मजबूत केली होती. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला मोठी मुसंडी मारायची असल्यास विदर्भाला झुकते माप देणे गरजेचे होते. त्यासाठी प्रदेशाध्यक्षपद आणि महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हे दोन्ही विदर्भाला देण्यात आले आहेत.
आतापर्यंतचे विदर्भातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष -
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कार्यकाळ
आबासाहेब खेडकर १९६०-६३
नाशिकराव तिरपुडे १९७८-७९
प्रतिभा पाटील १९८८-८९
रणजीत देशमुख १९९७-९८, २००३-०४
प्रभा राव २००४-०८
माणिकराव ठाकरे २००८-१५
Edited By : Atul Meher