कारंजाचे माजी आमदार प्रकाश डहाके यांचे निधन  - former karanja mla prakash dahake passes away | Politics Marathi News - Sarkarnama

कारंजाचे माजी आमदार प्रकाश डहाके यांचे निधन 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 10 मे 2021

गेल्या पंधरा वर्षांपासून ते कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते. जिल्ह्याच्या राजकारणात वजनदार नेता म्हणून त्यांची ओळख होती. मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता.

वाशीम : कारंजा बाजार समितीचे (Karanja Market Committee) विद्यमान सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश उत्तमराव डहाके (Former MLA Prakash Uttamrao Dahake) यांचे आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास नागपूर (Nagpur) येथे निधन झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर अमरावती (Amravati) व नागपूर येथे उपचार सुरू होते. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे ते मेव्हणे होते. 

कारंजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश डहाके यांना मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. कोरोना संसर्गातून ते बरे झाले होते. मात्र श्वास घेण्यास त्रास होत असल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. प्रकाश डहाके हे कारंजा विधानसभा मतदारसंघाचे 2009 ते 2014 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार होते. 

गेल्या पंधरा वर्षांपासून ते कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते. जिल्ह्याच्या राजकारणात वजनदार नेता म्हणून त्यांची ओळख होती. मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करून कारंजा विधानसभेची निवडणूक लढविली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यांच्या निधनाने जिल्ह्यात शोक व्यक्त केला जात आहे.

अजितदादा म्हणाले, संघर्षशील नेतृत्व हरपलं..
वाशीम जिल्ह्यातील कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश डहाके यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. प्रकाशदादा डहाके यांच्या निधनानं ग्रामीण जनतेशी नाळ जुळलेलं, शेतकरी, कष्टकरी बांधवांची दु:ख दूर करण्यासाठी तळमळीनं कार्य करणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे.

हेही वाचा : मोदी सरकार लोकांचे खिसे कापत आहे...नवाब मलिकांचा घणाघात...लूट थांबवा...

प्रकाशदादांचं निधन ही कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाची, वाशीम जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक चळवळीची तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी आहे. मी स्वर्गीय प्रकाशदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सर्वजण डहाके कुटुंबीयांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख