चिमुकल्यांच्या जिवाशी खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा… - filr charges against those who play with childrens soul | Politics Marathi News - Sarkarnama

चिमुकल्यांच्या जिवाशी खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा…

राजकुमार भितकर
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

एवढी मोठी घटना घडूनही प्रशासन कारवाई करीत नसेल तर शोकांतिका आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांना काहीही माहिती नव्हती.

यवतमाळ : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आगीत होरपळून, गुदमरून १० बालकांचा मृत्यू झाला. तसेच यवतमाळ येथे चिमुकल्यांना पोलिओ डोज ऐवजी सॅनिटायजर पाजण्यात आले. या दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आश्‍वासन महाविकास आघाडीतील नेत्यांनी दिले होते. प्रत्यक्षात अजूनपर्यंत एकावरही गुन्हे दाखल झालेले नाहीत. दोन्ही प्रकरणांत सरकारने तत्काळ एफआयआर नोंदविले नाही तर राज्यभर आंदोलनाचा करू, असा इशारा भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिला.

त्या काल येथे भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी आमदार मदन येरावार, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, राजू पडगीलवार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना वाघ म्हणाल्या, भंडारा येथील चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, अजूनही कारवाई झालेली नाही. केवळ निलंबन करून शासन मोकळे झाले आहे. यवतमाळ येथे चिमुकल्यांना ‘सॅनिटायझर’पाजण्यात आले. या प्रकरणातही केवळ निलंबन करण्यात आले. त्या बालकांचे नशीब बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले. 

एवढी मोठी घटना घडूनही प्रशासन कारवाई करीत नसेल तर शोकांतिका आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांना काहीही माहिती नव्हती. त्यामुळे शासन केवळ समिती नेमून दिशाभूल करीत असल्याचा आरोप वाघ यांनी केला. भंडारा तसेच यवतमाळ प्रकरणात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तत्काळ दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न केल्यास भाजप आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला.

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात आगीची घटना घडल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील डझनभर मंत्र्यांनी तेथे भेटी दिल्या. मात्र त्याचे फलित काहीच निघाले नाही. केवळ घोषणा, समिती नेमणे यापलीकडे सरकारने काहीही केले नाही. मृत्युमुखी पडलेल्या माता-पित्यांचे अश्रू अजूनही सुकलेले नाहीत. त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, येवढीही संवेदना सरकारची नाहीये. महाविकास आघाडीचे सरकार असंवेदनशील आहे. त्यामुळे आता अधिक वाट बघणे नाही. भंडारा आणि यवतमाळच्या दोन्ही प्रकरणांत कारवाई झाली नाही, तर राज्यभर आंदोलन करणार असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख