फडणवीसांना सतावतेय मुलीच्या लग्नाची चिंता... - fadanvis is worried about girls marriage | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीसांना सतावतेय मुलीच्या लग्नाची चिंता...

केवल जीवनतारे 
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

बाबुगिरीचा हा त्रास येथील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी फास बनतो आहे. अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्याकडे तक्रार केल्यानंतरही ती पूर्ण होत नसल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. आता थेट वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्र्यांकडे तक्रार करण्यात येईल, असे इंटकतर्फे कळविण्यात आले. 

नागपूर : मुलीचं लग्न धूमधडाक्यात करावं, हे प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. त्यासाठी बाप आयुष्यभर पुंजी जमा करतो. नोकरदार लोक असले तर, जमापुंजीसह पीएफचे पैसेसुद्धा लग्नासाठी लावतात. नागपुरातील फडणवीसांना पीएफचे पैसै मिळत नसल्यामुळे मुलीचे लग्न करावे कसे, ही चिंता लागली आहे. मुलीच्या लग्नासाठी बाबूगिरीच्या त्रासाला कंटाळलेले हे आहेत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेयो) एक्स-रे विभागात काम करणारे ५२ वर्षीय भास्कर नामदेव फडणवीस. 

‘अवघ्या पंधरा दिवसांवर मुलीचे लग्न येऊन ठेपले आहे साहेबऽऽ. मात्र, अजूनही पीएफचा पैसा मिळालेला नाही. महिनाभरापूर्वी अर्ज केला होता. सांगा साहेबऽऽ, मुलीचे लग्न कसे करायचे’, हा सवाल आहे भास्कर फडणवीस यांचा. तर सुनील नाणे यांनीही दुःखाने माखलेली व्यथा व्यक्त केली. ते म्हणतात, ‘साहेबऽऽ, पत्नीला कॅन्सर आहे. उपचारासाठी पैशांची गरज आहे. मी स्वतः कोरोना बाधित झालो होतो. सांगा, पत्नीवर उपचार करायचे कसे? मृत्यूनंतर पीएफचा पैसा मिळाला तरी काय उपयोग’? 

बाबुगिरी करणारे लिपिक इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून चिरीमिरी घेतल्याशिवाय काम करीत नाहीत. ही तक्रार अनेक कर्मचाऱ्यांकडून केली जाते. मेयोतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा एकप्रकारे छळ होत आहे. भास्कर फडणवीस अल्पदृष्टी असून हुडकेश्वर येथे राहतात. १६ फेब्रुवारीला त्यांच्या मुलीचे लग्न आहे. लग्नासाठी भविष्य निर्वाह निधीतील (जीपीएफ) अडीच लाखांच्या अनुदानासाठी अर्ज केला होता. पहिला अर्ज दिला. पुन्हा २२ जानेवारीला दुसरा अर्ज दिला. तरीही पैसे मिळाले नाहीत. यापेक्षाही गंभीर समस्या सुनील नाणे यांची आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा जीपीएफ हा कर्मचाऱ्यांचाच पैसा आहे. मात्र त्यांना वेळेवर मिळत नाही. 

बाबुगिरीचा हा त्रास येथील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी फास बनतो आहे. अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्याकडे तक्रार केल्यानंतरही ती पूर्ण होत नसल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. आता थेट वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्र्यांकडे तक्रार करण्यात येईल, असे इंटकतर्फे कळविण्यात आले. 

पत्नी दगावली तर जबाबदार कोण? 
सुनील महादेव नाणे (वय ५२) हे मेयो रुग्णालयात गार्ड आहेत. पत्नीला स्तन कॅन्सर आहे. जीपीएफ फंडातून उपचारासाठी अर्ज केला आहे. अद्याप निधी मिळालेला नाही. सुनीलने उसनवारी करून पत्नीवर उपचार केले. सुनीलही दोन महिन्यांपासून कोरोनाने आजारी आहे. परिस्थिती बिकट असूनही मेयोतील लिपिक मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात. 

कोणत्या आधारावर आम्ही त्यांना निधी देणार? 
भास्कर फडणवीस यांनी अर्जाद्वारे मुलीच्या लग्नासाठी निधी मागितला आहे. त्यानंतर त्यांना परत करण्यायोग्य किंवा परतावा न देणारी माहिती हवी आहे. ती दिली नाही. सुनील नाणे यांच्यासमवेत आम्ही पत्नीच्या उपचाराची कागदपत्रे मागितली होती. कोणत्या आधारावर आम्ही त्यांना निधी देणार? माहिती मिळाल्यानंतर अर्ज मंजूर करण्यात येतील. 
- डॉ. अजय केवलिया, 
अधिष्ठाता, मेयो.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख