नागपूर : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी काल येथे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप करीत टिका केली. प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी पंतप्रधान मोदी आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करण्याचा सपाटाच लावला आहे. ते मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत आणि हे त्यांच्या विकृत मनोवृत्तीचे उदाहरण आहे, असा हल्लाबोल विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनी आज केला.
मोदींवर नाना पटोलेंनी केलेली टिकेवर डॉ. फुके यांनी आज ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यावर कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी बुधवारी नागपुरात केलेली टीका, ही पटोले यांच्या विकृत मनोवृत्तीचे उदाहरण आहे. पटोले यांना मोदी द्वेषाने पछाडले आहे. मा. श्री. मोदीजी आणि आमचे नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याऐवजी पटोले यांनी आधी आपले घर दुरुस्त करावे. त्यांच्या निवडीमुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांची त्यांनी समजूत घालावी. आक्रस्ताळेपणा आणि विरोधकांना त्रास देणे, हा पटोले यांचा स्वभाव आहे. त्यांनी हे काम असेच प्रामाणिकपणे करावे. आम्ही मात्र आमच्या लोकसेवेचे कार्य असेच अखंडितपणे सुरू ठेऊ. पटोले यांना आमच्या शुभेच्छा.’
ट्विटमध्ये त्यांनी अमित शहा, जे.पी. नड्डा, चंद्रकात पाटील, देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. डॉ. फुके यांचे हे ट्विट सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. नाना फक्त गोष्टी करतात. त्यांच्या साकोली क्षेत्रामध्ये त्यांनी आजपर्यंत कोणते मोठे विकासाचे काम केले, हे त्यांनी सांगावे, अशी प्रतिक्रिया एकाने यावर दिली आहे. याशिवाय इतरही प्रतिक्रिया यावर आहेत. काल नाना पटोलेंचे नागपुरातील कार्यक्रम झाल्यानंतर सर्वप्रथम डॉ. फुके यांनी नानांना प्रत्युत्तर दिले आहे. आता नानांच्या बाजूने कोण ट्विट करणार, याची प्रतिक्षा आहे. या विषयावरून आता कॉंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आता ट्विटर वॉर होईल का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Edited By : Atul Mehere

