नाना पटोले यांचा मार्ग सुकर, लवकरच घोषणा ?

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची दिल्लीवारी झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याविषयी विविध तर्कवितर्क अजूनही लढविले जात आहेत.
Nana Patole
Nana Patole

नागपूर : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष कोण होणार, याची प्रतीक्षा राज्यभरातील कॉंग्रेसजनांसह सर्वांनाच लागली होती. या विषयात सुरुवातीला बरीच नावे चर्चेत आली. मग काही नावे मागे पडली. नंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ही दोनच नावे शर्यतीत राहिली. गेल्या दोन दिवसांत झालेल्या घडामोडींनंतर नाना पटोले यांचे नाव अध्यक्षपदासाठी नक्की झाल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. आज रात्री ८ वाजता औपचारिक घोषणा होणार असल्याचेही सांगण्यात येते. 

अध्यक्षपदासाठी सुरुवातीला नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, राजीव सातव यांचीही नावे चर्चेत होती. या सर्वांमध्ये नाना पटोले यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा सुरू होती, ती आजही आहे. दोन दिवसांपूर्वी पक्षश्रेष्ठींनी राज्यातील मंत्र्यांसोबत प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. त्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचेही सूत्र सांगतात. दिल्लीत आयोजित बैठकीला सोनिया गांधी उपस्थित नव्हत्या, पण त्यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांशी चर्चा केली, हे मात्र निश्‍चित, असेही सूत्रांनी सांगितले. श्रेष्ठींनी आज नाना पटोलेंना दिल्लीला बोलावले आहे. सायंकाळी ५ वाजता मुंबईहून ते दिल्लीसाठी ‘टेक ऑफ’ करणार असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. 

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची दिल्लीवारी झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याविषयी विविध तर्कवितर्क अजूनही लढविले जात आहेत. पण सूत्रांच्या म्हणण्यानुसार आज रात्री ८ वाजता प्रदेशाध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या सर्व चर्चांना विराम लागणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com