नागपूर कारागृहात पुन्हा कोरोनाची एन्ट्री, डॉन अरुण गवळीला लागण... - coronas entry in nagpur jail again don arun gawali infected | Politics Marathi News - Sarkarnama

नागपूर कारागृहात पुन्हा कोरोनाची एन्ट्री, डॉन अरुण गवळीला लागण...

अनिल कांबळे
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

गवळीसह अन्य कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला. गवळीसह पाच जणांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचा अहवाल पुढे आला. यांना कारागृहात वेगवेगळ्या बॅरेकमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

नागपूर : नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात डॉन अरुण गवळी आणि शेखूसह पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज प्रयोगशाळेतून प्राप्त झाला. यामुळे मध्यवर्ती कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना या सर्व बंदिवानांना कारागृहातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 

कोरोनाचा उद्रेक उपराजधानीत झाल्यानंतर जुलै २०२० मध्ये कारागृहात कोरोना विषाणूने आपले अस्तित्व दाखविणे सुरू केले होते. कारागृहात सहाशेवर कोरोनाबाधित आढळून आले होते. केवळ एकाला बाधा झाल्यामुळे अख्खे कारागृह कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. कोरोनाचा उद्रेक झाला होता, परंतु मृत्यूपासून कारागृह दूर होते. या उद्रेकावर कारागृह प्रशासनाने वैद्यक तज्ज्ञांच्या उपचार यंत्रणेतून विजय मिळवला. मात्र पुन्हा एकदा कारागृहात कोरोनाची एन्ट्री झाली. यामुळे येथे भीतीचे वातावरण पसरले आहे. उपराजधानीतील दैनंदिन व्यवहार सैल होत असताना पुन्हा एकाचवेळी पाच बंदिवान कोरोनाबाधित आढळले. यात दोन दिवसांपूर्वी अरुण गवळीची प्रकृती खालावली होती. त्यामुळे गवळीसह अन्य कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला. गवळीसह पाच जणांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचा अहवाल पुढे आला. यांना कारागृहात वेगवेगळ्या बॅरेकमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आलेल्या पाचही बंदिवानांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना तीन वेळा काढा, गरम पाणी तसेच त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आला आहे. कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांमध्ये गवळीसह कुख्यात शेखूचाही समावेश आहे. अन्य तिघे बंदिवान आहेत. 
- अनुपकुमार कुमरे, कारागृह अधीक्षक, नागपूर.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख