व्यावसायीक स्पर्धेतून कोळसा व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या, राजुऱ्यात तणाव !

राजू यादव यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर मारेकरी दुचाकीने पळाले. काही लोकांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, काही अंतरावर मारेकऱ्यांनी वाहन सोडून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे.
Crime
Crime

राजुरा (जि. चंद्रपूर) : कोळसा व्यापारी आणि कोळसा वाहतूक ट्रक चालक-मालक असोसिएशनच्या अध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना काल रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास येथील नाका नंबर तीन जवळच्या एका सलूनमध्ये घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सध्या राजुऱ्यात तणावाचे वातावरण आहे. मृत कोळसा व्यापाऱ्याचे नाव राजू यादव आहे. 

राजुरा, बल्लारपूर तालुक्‍यात वेकोलिच्या कोळसा खाणी मोठ्या प्रमाणात आहेत. कोळसा खाणीमुळे या परिसरात कोळसा व्यवसायाने चांगला जम पकडला आहे. राजुरा शहराला लागून असलेल्या रामपुरातील राजू यादव हेसुद्धा कोळसा व्यापारी होते. जय भवानी ट्रक असोसिएशनचे ते सचिव होते. त्यांचे स्वतःचे बजरंगबली ट्रान्सपोर्ट आहे. बजरंग दलाचे ते महासचिव होते. अनेक वर्षांपासून ते कोळसा वाहतुकीचा व्यवसाय करीत होते. वेकोलि परिसरात त्यांची चांगली ख्याती होती. रविवारी सायंकाळी ते राजुरा शहरातील नाका नंबर तीन येथील एका सलूनमध्ये कटिंग-दाढीसाठी आले होते. दाढी करीत असतानाच अज्ञात व्यक्ती तिथे आला. काही कळायच्या आत त्याने राजू यादव यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. घटना घडल्यानंतर पोलिस उशिरा पोहोचल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अवैध व्यवसायाचे सूत्र नाका नंबर तीन येथून चालतात. मात्र, या ठिकाणी पोलिस राहत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सध्या या प्रकरणावर माहिती देण्यास पोलिस टाळाटाळ करीत आहे. 

दुचाकी सोडून मारेकरी पसार 
राजू यादव यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर मारेकरी दुचाकीने पळाले. काही लोकांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, काही अंतरावर मारेकऱ्यांनी वाहन सोडून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. 

दारूवर चाप, कोळसा मोकाट, नेते आणि वेकोलि अधिकाऱ्यांची हातमिळवणी 
जिल्ह्यात अवैधरीत्या दारूच्या पुरवठ्यावरून सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दारूवरून पोलिसांवर आरोपांच्या फैरी झडत आहे. पोलिस दारूचा साठा जप्त करून आरोपांना प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र, वेकोलिच्या खाणींनी व्याप्त या जिल्ह्यात कोळसा तस्करीचे मोठे रॅकेट सुरू आहे. कोळशाच्या तस्करीत महिन्याकाठी कोट्यवधींची उलाढाल होत आहे. वेकोलिचे अधिकारी आणि बड्या राजकीय नेत्यांच्या हातमिळवणीतून तस्करी सुरू असल्याचे बोलले जात आहे. 

राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या केंद्रस्थानी सध्यातरी जिल्ह्यात दारू हाच विषय आहे. या विषयाच्या आडूनच अनेक अवैध व्यवसाय फोफावले आहेत. त्यातील कोळसा तस्करी एक. जिल्ह्यात कुंभार खैनी, सास्ती, पोवनी-2, पद्‌मापूर, लालपेठ, पैनगंगा, नीलजई -2 आणि कोलगाव आदी वेकोलिच्या कोळसा खाणी आहे. याच खाणींत कोळसा तस्करांचा सध्या धुमाकूळ सुरू आहे. वेकोलि अधिकाऱ्यांशी साटेलोटे करून रात्री कोळसा तस्करीचा काळा धंदा केला जातो. वीस ट्रक कोळसा काढण्याची परवानगी असेल तर तीस ट्रक कोळसा वेकोलितून बाहेर पाठविला जातो. शहराच्या वेशीवरील प्लॉटवर खाली केला जातो. पाच हजार रुपये प्रतिटन दराने तो खुल्या बाजारात विकला जातो. एकाच वाहतूक परवान्यावर अतिरिक्त कोळशाची वाहतूक केली जाते. 

यात शहरातील नामांकीत कोळसा व्यापारी आणि ट्रान्स्पोर्ट गुंतले आहेत. पोलिसांचे त्यांना पाठबळ असल्याने कारवाई होत नाही. दुसऱ्या प्रकारात रेल्वे वॅगनमधून जास्तीचा कोळसा संबंधित कंपन्यांना पाठविला जातो. एका रॅकमध्ये साधारणतः ऐंशी टन कोळसा बसतो. एका वॅगनमध्ये 56 रॅक असतात. यातील दहा ते बारा रॅकमधून अतिरिक्त कोळसा पाठविला जातो. मागील अनेक वर्षांपासून तस्करी सुरू आहे. परंतु अपवाद वगळता कारवाई होत नाही. वेकोलिचे बडे अधिकारी, राजकीय नेते आणि तस्करांची श्रृखंला तयार झाली आहे. याच साखळीच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांच्या राष्ट्रीय संपत्तीची चोरी होत आहे. आता पोलिसांनी दारूसोबत कोळसा तस्करीवरही चाप लावण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणजे कोळसा माफियासुद्धा नियंत्रणात राहतील. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com