केंद्र सरकार देशात शोषण करणारी व्यवस्था निर्माण करत आहे... - the central government is creating exploitation system in the country | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्र सरकार देशात शोषण करणारी व्यवस्था निर्माण करत आहे...

दिनकर गुल्हाने
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना मानणारा कार्यकर्ता मी पाहिला आहे. या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम संवादातून होत आहे. खरे तर शरद पवार यांच्यासारखा नेता राष्ट्रवादीकडे आहे, याचा इतर पक्षांना हेवा वाटतो.

पुसद (जि. यवतमाळ) : केंद्रातील भाजप सरकार शेतकरी व कष्टकऱ्यांच्या विरोधात असून देशात शोषण करणारी व्यवस्था निर्माण करीत आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी अस्वस्थ आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आज येथे म्हणाले.

येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक सभागृहात आज ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे’त मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. व्यासपीठावर अन्न व औषधी प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, प्रदेश महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर, प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश युवती अध्यक्ष सक्षणा सलगर, प्रदेश विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, रविकांत वरपे, आमदार इंद्रनील नाईक, जिल्हाध्यक्ष माजी आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया, महिला अध्यक्ष क्रांती राऊत, नगराध्यक्ष अनिता नाईक, डॉ. आशा कदम, निरीक्षक किशोर माथनकर, नाना गाडबैले, वसंतराव पाटील कान्हेकर उपस्थित होते.

विदर्भातील संवाद यात्रेबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की, प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना मानणारा कार्यकर्ता मी पाहिला आहे. या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम संवादातून होत आहे. खरे तर शरद पवार यांच्यासारखा नेता राष्ट्रवादीकडे आहे, याचा इतर पक्षांना हेवा वाटतो. त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. चांगल्या कार्यकर्त्यांची फळी उभारली पाहिजे, असेही पाटील याप्रसंगी म्हणाले. प्रा. संजय चव्हाण यांनी संचालन केले. तर ख्वाजा बेग यांनी आभार मानले.

माळपठार ’लिफ्ट इरिगेशन’ला हिरवी झेंडी !
आमदार इंद्रनील नाईक यांनी यावेळी दुष्काळग्रस्त माळपठाराचे नंदनवन करण्यासाठी पैनगंगेवरील ईसापूर धरणातून लिफ्ट इरिगेशन योजना राबवावी, पूस धरणाखाली तीन बॅरिकेट्स उभारावेत, लघू प्रकल्प पूर्ण करावेत, आदी मागण्या केल्या असता नाइकांच्या कामांना ‘ना’ नाहीच’ या शब्दात त्यांनी या मागण्या पूर्ण झाल्या म्हणून समजा, असे खात्रीपूर्वक सांगितले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख