भाजपने मेडिकल कॉलेजच्या मुद्याचे भांडवल करू नये... - bjp should not capitalize the issue of medical colleges | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपने मेडिकल कॉलेजच्या मुद्याचे भांडवल करू नये...

राजू तंतरपाळे
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनाला राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. शेतक-यांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी रस्त्यांवर खिळे लावण्याचा प्रकार देशाने यापूर्वी कधी पाहिला नव्हता,

अमरावती : राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला शासकीय मेडिकल कॉलेज दिल्यानंतर पुढील काही दिवसांत अमरावतीसह नाशिक व परभणी या जिल्ह्यांसाठी शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली. भाजप या मुद्याचे भांडवल करू पाहत आहे, ते त्यांनी करू नये, असेही पवार म्हणाले. 

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीसाठी ते येथे आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, की कोरोनाच्या परिस्थितीमुळे अमरावतीच्या मेडिकल कॉलेजचा मुद्दा बाजूला पडला होता. मात्र आता त्यावर शिक्कामोर्तब करून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भाजप याविषयाचे राजकीय भांडवल करीत असल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनाला राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. शेतक-यांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी रस्त्यांवर खिळे लावण्याचा प्रकार देशाने यापूर्वी कधी पाहिला नव्हता, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. 

राज्यातील सहा महसूल विभागांतून उत्कृष्ट कामगिरी करणा-या प्रत्येकी एका जिल्ह्याची निवड करण्यात येऊन त्या जिल्ह्याला प्रोत्साहनपर अनुदान म्हणून अतिरिक्त २५ ते ५० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. याशिवाय महिला व बालकल्याणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तीन टक्के निधीची तरतूद करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके उपस्थित होत्या.

बेलोरा विमानतळासाठी भरीव निधी
अपूर्णावस्थेत असलेल्या बेलोरा येथील विमानतळ धावपट्टीच्या कामासाठी तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता महाविकास आघाडी सरकारने ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच हे काम पूर्णत्वास येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख