उपमुख्यमंत्र्यांसमोरच भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आले आमने-सामने, अन् मग... - bjp ncp workers face to face in front of deputy chief minister and then | Politics Marathi News - Sarkarnama

उपमुख्यमंत्र्यांसमोरच भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आले आमने-सामने, अन् मग...

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

जिल्ह्याला ८५० कोटी रुपये द्यावे, ३६५ कोटींच्या अखर्चित निधीला मुदतवाढ द्यावी, सर्व आमदारांना विश्वासात घेऊन निधी वाटप करावा, आदी मागण्या केल्या जात होत्या. या दरम्यान प्रकाश गजभिये कार्यकर्त्यांसोबत आयुक्तालयात आले.

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांनी काल विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीवर भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांनी बहिष्कार टाकला होता आणि पवार व महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नारेबाजीही केली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांनीही केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ वातावरण चांगलेच तापले होते. 

जिल्हा नियोजन समितीचा ८५० कोटींचा निधी पूर्ण द्यावा. तसेच अखर्चिक निधीला मुदतवाढ द्यावी, याकरिता भाजपचे नेते आंदोलन करीत होते. तेव्हाच प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने जीएसटीचे २८ हजार कोटी द्यावेत, अशी मागणी करीत घोषणाबाजी केली. अजित पवार यांच्यासमोरच दोन्ही पक्षांत घोषणाबाजीचे युद्ध रंगल्याने विभागीय आयुक्तालय परिसर दणाणून गेला होता. 
 
अजित पवार यांची विभागीय आयुक्तालयात जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीसाठी आले होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार समीर मेघे, महापौर दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात घोषणा देण्यात येत होत्या. जिल्ह्याला ८५० कोटी रुपये द्यावे, ३६५ कोटींच्या अखर्चित निधीला मुदतवाढ द्यावी, सर्व आमदारांना विश्वासात घेऊन निधी वाटप करावा, आदी मागण्या केल्या जात होत्या. या दरम्यान प्रकाश गजभिये कार्यकर्त्यांसोबत आयुक्तालयात आले. त्यांनी केंद्राने जीएसटीचे पैसे आधी द्यावे, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावे यासाठी घोषणाबाजी केली. 

पेट्रोल दरवाढीबाबत आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडे केली. त्यामुळे चांगलाच कलगीतुरा रंगला होता. नगरसेवक दुनेश्‍वर पेठे, महेंद्र भांगे, विजय गजभिये, हाजी आसिफ भाई, गोपी आंबोरे, बदल शेंद्रे, अमित मुडेवार यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 
 
भाजपच्या लोकांनी आंदोलन करून निवेदन दिले. विकास कामे थांबवल्याची त्यांची तक्रार आहे. यासंबंधात सर्व संबंधित अधिकारी व आमदारांची बैठक मुंबईत घेऊ. 
अजित पवार, उपमुख्यमंत्री. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख