महानगरपालिकेचा झाला आखाडा; भाजप-कॉंग्रेसचे नगरसेवक भिडले, अन् महापौरही उतरल्या...

लोकशाहीच्या मंदिरात पीठासीन अधिकाऱ्यांनी स्वतः बॉटल फेकून मारणे, स्थायी समितीच्या सभापतींनी विरोधकांच्या अंगावर धावून जाण्याचा ऐतिहासिक प्रयोग चंद्रपूरकरांना बघायला मिळाला.
महानगरपालिकेचा झाला आखाडा; भाजप-कॉंग्रेसचे नगरसेवक भिडले, अन् महापौरही उतरल्या...
Sarkarnama Banner

चंद्रपूर : महानगरपालिकेचा गाडा अद्यापही रुळावर आलेला नाही. सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद येथे नित्याचाच झाला आहे. पण काल मात्र हद्दच झाली. भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेसचे नगरसेवक आपसांत भिडले आणि पीठासीन अधिकारी असलेल्या महापौर राखी कंचर्लावार यांनाही या आखाड्यात उतरण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी पाण्याची बॉटल विरोधकांना फेकून मारत आखाड्यात आपणही आहोत, हे दाखवून दिले.  

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वादात सापडत असलेली चंद्रपूर महानगरपालिका पुन्हा एकदा चर्चेत आली. काल झालेल्या आमसभेत सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांत चांगलाच राडा झाला. महापौरांनी पाण्याची बॉटल विरोधकांना फेकून मारत महापौरांनी आपले 'कर्तव्य' पार पाडले. दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी आपल्या भाषा कौशल्याचे जाहीर प्रदर्शन करीत एकमेकांना येथेच्छ शिवीगाळ केली. आयुक्त राजेश मोहिते सदस्यांना हात जोडून शांत राहण्याची विनंती करीत होते. परंतु, त्यांचे शेवटपर्यंत कुणीच मनावर घेतले नाही. अखेर, दोन्ही पक्षांतील झोंबाझोंबी पोलिस ठाण्यात पोहोचली आणि एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सुरू झालेला आभासी आमसभेचा (ऑनलाइन) फार्स आजही करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. परंतु, मनसेचे नगरसेवक सचिन भोयर यांनी सत्ताधाऱ्यांचे मनसुबे उधळून लावले. दरवर्षी भोयर यांचे शहरातील रस्त्यावरील खड्ड्य़ांबाबत एक आंदोलन ठरलेच असते. त्याचा मुहूर्त त्यांना आज मिळाला. वीस-पंचवीस कार्यकर्त्यांची शोभायात्रा घेऊन ते थेट मनपाच्या सभागृहात घुसले. नियमाप्रमाणे आभासी आमसभेत गटनेते आणि सभागृह नेत्यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे. भोयर यांनी मनसे स्टाइलने हा नियम मोडीत काढला. त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनाही जाग आली. त्यांनीही सभागृहात घुसखोरी केली. आत घुसखोरी केलेल्या सर्वांना महापौरांनी शासनाच्या कोराना काळातील नियमांची आठवण करून दिली. परंतु कुणीच ऐकले नाही. 

नेहमीप्रमाणे काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर आणि सुनीता लोढिया यांनी मनपाच्या भ्रष्टाचाराचा फलक सोबतच आणला होता. तो सभागृहात फडकाविला. दुसरीकडे महापौर आणि नागरकर यांच्यात चर्चा सुरू होती. चर्चा हळहळू वादात रूपांतरित झाली आणि दोघांचाही पारा सरकला. महापौरांच्या टेबलवर नागरकरांनी जोराने हात आपटला आणि महापौरांच्या 'नेमप्लेट'चे दोन तुकडे झाले. 'राखी' एकीकडे आणि 'कंचर्लावार' दुसरीकडे विखुरल्या गेले. त्यामुळे महापौरांचा संयम सुटला. त्यांनी टेबलावरील पाण्याची बॉटल नागरकरांच्या दिशेने भिरकावली. दरम्यान, भोयर आपली शोभायात्रा घेऊन सभागृहाच्या बाहेर गेले होते. 

महापौरांचा नेम नागरकरांनी अलगद चुकविला. तोपर्यंत सभागृहात चांगलाच गदारोळ सुरू झाला. यात संधी हेरली ते स्थायी समितीचे सभापती रवी आसवांनी यांनी. आपल्या निष्ठेचे प्रदर्शन करीत आसवानी ताडकन आसनावरून उठले आणि नागरकरांवर चालून गेले. दोघांनीही एकमेकांना धक्काबुक्की केली. दोन्हीकडून शिव्यांची स्पर्धाच सुरू झाली. मनपाचे कोणतेही काम असो 'मध्यस्थी' करण्याची अलिखित जबाबदारी भाजपचे सभागृह नेते संदीप आवारी यांच्याकडेच असते. यावेळी त्यांनी आपली भूमिका नेटाने वठविली. दोन्ही पक्षाच्या सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. गदारोळामुळे आमसभेत पहिल्यांदाच बोलण्याची संधी न मिळाल्याची नाराजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होती. 

शिवसेनेचे नगरसेवक सुरेश पचारे नेमके कुणाच्या बाजूने होते ते शेवटपर्यंत कुणालाच कळले नाही. मागील साडेचार वर्षांत सभागृहात तोंड न उघडणारे विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे डॉ. सुरेश महाकुलकर या गदारोळातही समाधिस्थ राहून आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहिले. स्थायी समितीच्या खुर्चीची आस लावून असणारे भाजपचे गटनेते वसंता देशमुख यांनी एक शब्दही न बोलता सभागृहातील आखाड्याचा आनंद लुटला. शेवटी कधी नव्हे ते पोलिसांनीही पहिल्यांदा मनपाच्या सभागृहात हजेरी लावली. तोपर्यंत वातावरण शांत झाले होते. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रारीचा सोपस्कार पार पाडला. यानिमित्ताने मात्र  
 
लोकशाहीच्या मंदिरात पीठासीन अधिकाऱ्यांनी स्वतः बॉटल फेकून मारणे, स्थायी समितीच्या सभापतींनी विरोधकांच्या अंगावर धावून जाण्याचा ऐतिहासिक प्रयोग चंद्रपूरकरांना बघायला मिळाला. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.