‘मोदी है तो मुमकीन है’, हा विश्वास देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प : आमदार सुधीर मुनगंटीवार - this is an all inclusive budget that gives confidence said sudhir mungantiwar | Politics Marathi News - Sarkarnama

‘मोदी है तो मुमकीन है’, हा विश्वास देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प : आमदार सुधीर मुनगंटीवार

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

जे लोक म्हणतात, लॉक डाऊन मध्ये छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडलेत, नोकऱ्या गेल्या, त्यांच्यासाठी ही मोठी चपराक आहे. या काळात नोकरी टिकवणं खूप अवघड झालं होतं. अशात संकटातून संधीही निर्माण झालेल्या आहेत.

नागपूर : कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटावर मात करत त्यातून संधी शोधत भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचा संकल्प करत, त्या संकल्पपूर्तीसाठी पावले उचलणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प आज केंद्रीय वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आत्मनिर्भर भारत ही संकल्पना सार्थ ठरविणारा हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला ‘मोदी है तो मुमकीन है’, हा विश्वास देणारा असल्याची प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री तथा विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

जानेवारी २०२१ मध्ये १.२० लाख कोटी रुपये आजपर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक जीएसटी कलेक्शन झालं आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर आजपर्यंतचा हा सर्वाधिक कलेक्शन आकडा आहे. जे लोक म्हणतात, लॉक डाऊन मध्ये छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडलेत, नोकऱ्या गेल्या, त्यांच्यासाठी ही मोठी चपराक आहे. या काळात नोकरी टिकवणं खूप अवघड झालं होतं. अशात संकटातून संधीही निर्माण झालेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने एमएसएमईला प्रोत्साहन देत देशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी मोठं योगदान दिले गेले आहे. विशेषतः महाराष्ट्रात सर्वाधिक एमएसएमईने मोठ्या प्रमाणात कर्ज तरुणांना दिले आहे . 

उद्योग, कृषी, पायाभूत सुविधा अशा सर्वच क्षेत्रांसाठी भरीव आर्थिक तरतूद करत महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठीसुद्धा ठोस पावले या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उचलली गेली आहेत. नागपूर व नाशिक येथील मेट्रोसाठी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. पुन्हा या देशाला प्रगतिपथावर नेण्याचा संकल्प करत त्या दृष्टीने केलेले संकल्प आश्वासक व तमाम देशवासीयांना दिलासा देणारे असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. या सर्वस्पर्शी अर्थसंकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख