राठोडांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग, काही नेत्यांमध्ये अस्वस्थता... - after rathores resignation political movements in the district gained momentum | Politics Marathi News - Sarkarnama

राठोडांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग, काही नेत्यांमध्ये अस्वस्थता...

राजकुमार भितकर
मंगळवार, 2 मार्च 2021

राजीनाम्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलायला सुरुवात झाली आहे. पालकमंत्री आपल्या गटाचा व्हावा, यासाठीही आता लॉबिंग सुरु झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री पद कुणाकडे जाणार यावर अधिवेशनानंतर शिकामोर्तब होण्याची शक्यता आहे.

यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासुन संपुर्ण राज्यात गाजत असलेल्या पुजा चव्हाण मृत्यु प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी रविवार वनमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जिल्ह्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. नवीन पालकमंत्री कोण, याबाबत चर्चा सुरु असतानाच शिवसेनेच्या काही नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

जिल्हा हा फार पुर्वीपासुन राज्याच्या राजकारणात महत्वाचे केंद्र राहीला आहे. याच जिल्ह्याने राज्याला सर्वाधीक काळ मुख्यमंत्री पद भुषविणारे नेते दिले आहेत. प्रत्येक पंचवार्षीकमध्ये मंत्रीपद जिल्ह्याच्या वाट्याला आले आहे. काँग्रेस, भाजपा, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वच पक्षांचे प्रमुख व वजनदार नेते जिल्ह्यात आहेत. सध्या राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्याकडे वनखात्याचा कार्यभार होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा यवतमाळ जिल्ह्यातील एकमात्र मंत्रीपदाची संधी मिळाली होती. 

पुणे येथे घडलेल्या पुजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यु प्रकरणात संजय राठोड यांचे नाव असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते करीत आहेत. भाजपने राठोड यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी लावून धरली होती. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. त्यामुळे जिल्ह्याच्या वाट्याला आलेले एकमेव मंत्रीपद गेले. त्यामुळे आता नवे मंत्री तसेच पालकमंत्री कोण? याबाबत चर्चा सुरु आहे. या चर्चेत गुलाबराव पाटील, अ‍ॅड. यशोमती ठाकुर, बच्चू कडू यांची नावे चर्चेत आहेत. तर काहीच्या मते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनिल नाईक यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे. 

त्यानंतर तेच पालकमंत्री होतील, अशी जोरदार चर्चा समाजमाध्यमावर सुरु आहे. जिल्ह्यात भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा प्रत्येक एक असे विधानसभेचे सात आमदार आहेत. विधानपरिषदेवर भाजप, काँग्रेस तसेच शिवसेनेचा प्रत्येकी एक आमदार आहेत. असे असले तरी मंत्रीमंडळात संजय राठोड यांना शिवसेनेने संधी दिली. राजीनाम्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलायला सुरुवात झाली आहे. पालकमंत्री आपल्या गटाचा व्हावा, यासाठीही आता लॉबिंग सुरु झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री पद कुणाकडे जाणार यावर अधिवेशनानंतर शिकामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख