राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनंतर पदाधिकाऱ्यांचेही राजीनामे... - after the district president of ncp bearers also resigned | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनंतर पदाधिकाऱ्यांचेही राजीनामे...

सचिन शिंदे
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

आर्णी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाला चिकटून असलेल्या कार्यकर्त्यांची चांगलीच नाराजी झाली. त्यांनीसुद्धा आज दुपारी 12 वाजता आर्णी येथील विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन आमच्या नेत्यावर झालेला अन्याय सहन होत नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

आर्णी (जि. यवतमाळ) : राज्याचे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आटोपून यवतमाळ जिल्ह्यातून जाताच जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांनी राजीनामा दिला. त्यानंतर दोनच दिवसांत जिल्हा कार्यकारिणीच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले. पक्षासोबत प्रामाणिक, पण आता पद नकोच, असे राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 

आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जिल्हा तसेच तालुक्याच्या ठिकाणी गेले होते. यवतमाळ जिल्ह्यातील पक्षाच्या कार्याचा आढावा घेताना अनेक पदाधिकारी हे केवळ पदे घेऊन निष्क्रिय असल्याची चर्चा  झाली. आपल्या कामासाठीच पदाचा वापर होत असून पक्षवाढीसाठी काहीच प्रयत्न होत नाही. पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या लोकांमध्ये जुन्या लोकांना डावलण्यात येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पक्षाचा विस्तार होताना दिसत नाही. 

जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला जात नाही आणि मोजकेच कार्यकर्ते पद घेऊन बसलेले आहेत. नवीन कार्यकर्ते जोडले जात नाही. अशा अनेक बोलक्या तक्रारी प्रदेशाध्यक्ष यांच्या कानी पडल्याची चर्चा चांगलीच रंगली. पक्ष संघटन मजबूत करायचे तर ते खिळखिळे झाल्याचा ठपका ठेवत जिल्ह्याच्या पक्षनेतृत्वाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी विधानपरिषद सदस्य ख्वाजा बेग यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. पक्षातील कुरघोडीचा ठपका कार्यकर्त्यांच्या माथी मारून मोकळे ते झाले. 

त्यामुळे आर्णी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाला चिकटून असलेल्या कार्यकर्त्यांची चांगलीच नाराजी झाली. त्यांनीसुद्धा आज दुपारी 12 वाजता आर्णी येथील विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन आमच्या नेत्यावर झालेला अन्याय सहन होत नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष मुबारक तंवर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिलाश इंगोले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष चिराग शहा, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुनील पोतगंटलवार, संदीप बुटले, शेखर खंदार, संजय व्यवहारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख