‘त्या’ वादानंतर खासदार आणि आमदार दोघेही म्हणतात, आमच्या जिवाला धोका !

वाशीम शहर पोलिसांनी तक्रारी चौकशीत ठेवल्या आहेत. या नेत्यांच्या तक्रारीनंतर कार्यकर्तेही एकमेकांविरोधात सरसावले आहेत. कार्यकर्त्यांच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल करणे सुरूच आहे.
Bhawana Gawali and Rajendra Patni
Bhawana Gawali and Rajendra Patni

नागपूर : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना खासदार भावना गवळी आणि कारंजाचे भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात २६ जानेवारीला शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर काल यवतमाळात विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संतोष ढवळे यांनी आमदार पाटणींनी जिवे मारण्याची धमकी दिली. खासदार गवळी आणि आमदार पाटणी या दोघांनीही वाशीम शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी दिलेल्या तक्रारींमध्ये जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे.  

खासदार भावना गवळी यांनी वाशीम शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २६ जानेवारीला पालकमंत्र्यांच्या बैठकीला जात असताना काही लोक गुंठेवारीतील भूखंडांसंदर्भात मला भेटायला आले होते. त्यांच्याशी चर्चा करीत असताना राजेंद्र सुखाराम पाटणी ७० ते ८० लोकांसह आले आणि मला व गोपीकिशन बाजोरीया यांना सांगितले की, गुंठेवारीच्या विषयामध्ये तुम्ही पडू नका. त्यावर आम्ही त्यांना सांगितले की, आम्ही हा विषय पालकमंत्र्यांसमोर मांडू आणि शासनदरबारी पाठपुरावा करू. त्यानंतर पाटणी मला अर्वाच्य भाषेत बोलले. गोपीकिशन बाजोरिया यांनी त्यांना समजावूनदेखील सांगितले. पण त्यानंतरही त्यांनी तुम्ही दोघे मिळूनही माझे काही बिघडवू शकत नाही. तू व बाजोरिया वाशीम जिल्ह्यात कसे फिरता, असे म्हणत दमदाटी केली. दरम्यान पालकमंत्री आल्‍याने आम्ही सर्व बैठकीसाठी निघून गेलो. राजेंद्र सुखानंद पाटणी यांनी अर्वाच्य भाषेत बोलून भारताच्या सर्वोच्च सभागृहाच्या महिला खासदाराचा अवमान केला आहे आणि धमकीसुद्धा दिली आहे. ते माझ्यावर व माझ्या कार्यकर्त्यांवर हल्लादेखील करू शकतात. त्यामुळे त्यांच्याविरोधात त्वरित गुन्हा दाखल करून कारवाई करावी. 

आमदार पाटणी आपल्या तक्रारीत म्हणतात, २६ जानेवारीला जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीसाठी मी माझा अंगरक्षक सतीश दिंडे, स्वीय सहायक सुभाष सुरोशे, श्रीमती करुणा कल्ले गेलो होतो. आम्ही सर्व मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करीत असताना आतमधील पॅसेजमध्ये खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि ५० ते ६० लोक उभे होते. तेव्हा खासदार गवळींनी आवाज दिला आणि माझ्यासोबत भांडण सुरू केले. म्हणाल्या माझ्याशी खेटे घेऊ नका, तुमच्या तक्रारी करीन, सीबीआयपर्यंत तक्रारी करीन, तुम्हाला संपवून टाकीन, पाहून घेईन असे म्हणत दमदाटी केली. त्यांच्यातील काही लोकांनी माझ्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या अंगरक्षकाने त्यांना अडवले. भावना गवळी व तिचे साथीदार भविष्यात काय करतील, याचा नेम नाही. अशा परिस्थितीत शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात यावी. 

वाशीम शहर पोलिसांनी तक्रारी चौकशीत ठेवल्या आहेत. या नेत्यांच्या तक्रारीनंतर कार्यकर्तेही एकमेकांविरोधात सरसावले आहेत. कार्यकर्त्यांच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल करणे सुरूच आहे. दरम्यान काल शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संतोष ढवळे यांनी आमदार पाटणींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करताना जिवे मारण्याच्या दिलेल्या धमकीनंतर वातावरण तापले होते. आता पुढे हे प्रकरण कोणते वळण घेईल, याकडे यवतमाळ व वाशीम या दोन्ही जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com