‘या’साठी आभा पांडेंनी राष्ट्रवादी प्रवेशासाठी निवडले शांतीनगर... - abha pande chose shanti nagar for ncp entry for this reason | Politics Marathi News - Sarkarnama

‘या’साठी आभा पांडेंनी राष्ट्रवादी प्रवेशासाठी निवडले शांतीनगर...

राजेश चरपे
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

पूर्व नागपूरमध्ये दावेदारी करण्याची अनेक कारणे आहेत. आघाडी झाल्यास हाच मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे मागील विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल राष्ट्रवादीसाठी पूर्व नागपूर सोडावे, यासाठी आग्रही होते.

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागपूर दौऱ्यात नगरसेवक आभा पांडे यांनी रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ‘तुम्ही विधानसभेत हव्या’, असे अजितदादा भाषणात म्हणाले. त्यामुळे आभा यांनीही लगेच पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघावर दावा केला. राष्ट्रवादी प्रवेशासाठी शांतीनगरची निवडही त्यांनी याच कारणामुळे केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी पूर्ववर दावा केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

महापालिकेच्या निवडणुकीत या परिसरातून नगरसेवक म्हणून दुनेश्वर पेठे एकमेव निवडून आले आहेत. ते येथील प्रबळ दावेदार मानले जातात. आभा पांडे बंडखोर नेत्या म्हणून ओळखल्या जातात. काँग्रेसमध्ये असताना त्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष होत्या. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या कट्टर समर्थक म्हणून त्यांना ओळखले जायचे. नंतर त्या मुत्तेमवार गटात सहभागी झाल्या होत्या. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विरोधात त्यांनी बंडखोरी केली आणि निवडणूक लढली. नंतर त्यांनी ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली. चार वॉर्डाच्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढण्याचे धाडस त्यांनी दाखवले. यात त्या यशस्वीसुद्धा ठरल्या आहेत. आत्मविश्वास उंचावल्याने त्यांनी आता विधानसभेत जायचे ठरवले आहे. मात्र विधानसभा स्वबळावर लढणे अवघड असल्याची जाणीव झाल्याने त्या पक्षाच्या शोधातच होत्या. काँग्रेसमध्ये पुन्हा जाणे शक्य नव्हते आणि भाजपच्या काही नेत्यांचा त्यांच्या प्रवेशाला विरोध होता. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ केले. 

पूर्वमध्ये जाण्याचे कारण 
मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील जातीय समीकरणात निवडून येणे अवघड आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षातच येथे अटीतटीचा सामना होतो. हलबा आणि मुस्लिम समाजाची संख्या निर्णायक आहे. अशा परिस्थितीत टिकाव लागणे शक्य नसल्याने प्रभागाच्या शेजारीच असलेल्या पूर्व नागपूरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. पक्षप्रवेशाकरिता मुद्दामच पूर्व नागपुरातील शांतीनगरची निवड केली. पूर्वचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्याशी त्यांचे परंपरागत वैर आहे. त्यांचे पती बिज्जू पांडे आणि कृष्णा खोपडे यांनी एकमेकांच्या विरोधात यापूर्वी निवडणूकसुद्धा लढविली आहे.
 
पूर्व एकमेव आशा 
पूर्व नागपूरमध्ये दावेदारी करण्याची अनेक कारणे आहेत. आघाडी झाल्यास हाच मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे मागील विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल राष्ट्रवादीसाठी पूर्व नागपूर सोडावे, यासाठी आग्रही होते. त्यावेळी राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून दुनेश्वर पेठे यांचेच नाव आघाडीवर होते. मात्र काँग्रेसने शेवटपर्यंत जागा सोडली नाही. आपण आग्रह सोडल्याची खंत पटेल यांनी अनेकदा नागपूर येथील कार्यक्रमात बोलावून दाखवली आहे. कदाचित यावेळी राष्ट्रवादीने पूर्व नागपूरमधून जोर लावेल, अशी आशा असल्याने आभा पांडे यांनी आधीच दावा केल्याचे बोलले जात आहे. यातही पक्षप्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुम्ही विधानसभेत हव्या, अशी प्रशंसा केल्याने आभा पांडे समर्थकांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख