...आणि जिल्हा परिषद अध्यक्षांच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला

पाणीटंचाईची कामे होऊनही पाणी मिळत नसेल तर झालेल्या कामाचे कौतुक का म्हणून करावे, असे म्हणत भाजपचे जिल्हा परीषद सदस्य सुरेंद्र शेंडे यांनी भाजपच्याच जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांना घरचा आहेर दिला. यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला.
...आणि जिल्हा परिषद अध्यक्षांच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला

नागपूर : पाणीटंचाईची कामे होऊनही पाणी मिळत नसेल तर झालेल्या कामाचे कौतुक का म्हणून करावे, असे म्हणत भाजपचे जिल्हा परीषद सदस्य सुरेंद्र शेंडे यांनी भाजपच्याच जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांना घरचा आहेर दिला. यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला.

जिल्हा परिषदेच्या सभेत पाणीप्रश्‍न चांगलाच पेटला. विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचा चांगलाच पाणउतारा केला. 625 पैकी फक्त 151 बोअरवेल झाले आहेत. यातील केवळ 16 बोअरवेलचे हॅण्डपंप बसविण्यात आले आहेत. टंचाईची निम्मी कामे झाली नसल्याची टीका विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी केली. यावर अध्यक्षा निशा सावरकर म्हणाल्या की, राज्यात सर्वाधिक बोअरवेलची कामे नागपूर जिल्ह्यात झालीत. केवळ विरोधासाठी विरोध करणे योग्य नाही. यासाठी अध्यक्षांचे कौतुक व्हायला पाहिजे. त्याऐवजी टीका होत आहे. हे बरोबर नाही. 

लोक पाण्यासाठी भटकत असताना सत्ताधाऱ्यांचे कौतुक करताच येणार नसल्याचे कुंभारे म्हणाले. भाजप सदस्य जयकुमार वर्मा म्हणाले की, बोअरवेलकरिता पाइप कंत्राटदाराकडून घेण्यात येत आहेत. पूर्वी जिल्हा परिषद खरेदी करीत होते. याकरिता शासनाची विशेष परवानगी घेण्यात आली. अधिकाऱ्यांनी ही पद्धत यंदा नाकारली. यामुळे टंचाईच्या कामास उशीर होत आहे. पाइप खरेदीत मोठा घोटाळा समोर येणार असल्याची शंका वर्मा यांनी व्यक्त केली. सुरेंद्र शेंडे यांनी अध्यक्षांना लक्ष्य केले. बोअरवेलची कामे मोजक्‍याच ठिकाणी झालीत. अनेक भागांत ती झाली नाहीत. बोअरवेल करण्यात आल्यानंतरही नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत असेल तर त्यात कौतुक करण्यासारखे काय, असे शेंडे म्हणाले. शेंडेंच्या या वक्तव्यानंतर अध्यक्षांच्या चेहरा कोमेजला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com