Nagpur ZP politics | Sarkarnama

नागपूर जि. प. मुदतवाढीवरून पालकमंत्री-पदाधिकारी संघर्ष? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 17 मार्च 2017

नागपूर जिल्हा परिषदेच्या मुदतवाढीवरून नागपूर परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्‍यता आहे. 

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या मुदतवाढीवरून नागपूर परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्‍यता आहे. 

नागपूर जिल्हा परिषदेची मुदत येत्या 20 मार्चला संपणार आहे. जिल्हा परिषदेला मुदतवाढ मिळावी, यासाठी नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर यांच्यासह चार पदाधिकाऱ्यांनी मुंबईत ठाण मांडले आहे. नागपूर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींना नगरपंचायतचा दर्जा मिळाल्याने जिल्हा परिषदेच्या सर्कलची पुनर्रचना होणार आहे. यासाठी उच्च न्यायालयात याचिका टाकल्याने नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता नागपूर जि. प. निवडणुका मे-जून महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. नागपूर जि. प.ची मुदत 20 मार्चला संपल्यानंतर राज्य सरकार काय निर्णय घेईल, याकडे जिल्ह्यातील राजकारण्यांचे लक्ष लागले आहे. 

सध्याच्या पदाधिकाऱ्यांना पुढील निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ देण्यासाठी राज्य सरकारला अध्यादेश जारी करावा लागेल किंवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सर्व अधिकार सोपवावे लागेल. 

जिल्हा परिषद अध्यक्ष असताना निवडणुका व्हाव्या, यासाठी अध्यक्ष निशा सावरकर इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी उपाध्यक्ष शरद डोणेकर इतर पदाधिकाऱ्यांसह मुंबई गाठली आहे. जि. प. ला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाणार आहे. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळू नये, यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. पालकमंत्री असल्याने जिल्हा परिषदेच्या कारभारावर थेट नियंत्रण ठेवण्यासाठी बावनकुळे यांची इच्छा असल्याचे समजते. यामुळे आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख