नागपूर जि.प., पंचायत समित्यांच्या निवडणुकीला साडेसात वर्षांनंतर मुहूर्त

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या नामांकणाला आज बुधवारपासून सुरुवात झाली. दरन्यान सर्वोच्च न्यायालयाने "स्थगिती नाही' असे सांगत सुनावणी पुढे ढकलल्याने इच्छुकांनी मोकळा श्‍वास घेतला आहे. आता खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंग चढणार असून उद्यापासून नामांकन दाखल करण्यास गती मिळणार आहे.
नागपूर जि.प., पंचायत समित्यांच्या निवडणुकीला साडेसात वर्षांनंतर मुहूर्त

नागपूर  : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या नामांकणाला आज बुधवारपासून सुरुवात झाली. दरन्यान सर्वोच्च न्यायालयाने "स्थगिती नाही' असे सांगत सुनावणी पुढे ढकलल्याने इच्छुकांनी मोकळा श्‍वास घेतला आहे. आता खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंग चढणार असून उद्यापासून नामांकन दाखल करण्यास गती मिळणार आहे.

गेल्या बुधवारी सकाळी 11 वाजतापासून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. मात्र, सकाळपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हाभर निवडणुकीवर स्थगिती मिळाणार असल्याची चर्चा रंगली होती. सोशल मीडियावर तर याचे मोहोळ उडाले होते. खर काय कुणालाच कळत नव्हते. एकेमकांना फोन करून कोर्टाने काय निर्णय दिला याची विचारणा करण्यात येत होती. सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांमुळे इच्छुकांच्या डोक्‍याचा ताप वाढला होता. मात्र, दुपारी दोन नंतर इच्छुकांची लगबग सुरू झाली.

जिल्हा परिषदेच्या 58 व 13 तालुक्‍यातील पंचायत समितीच्या 116 जागांसाठी तब्बल साडेसात वर्षांनंतर निवडणूक होत आहे. आरक्षणाचा वाद कायम असला तरी यावर सर्वोच्च न्यायालयात निवडणुकींनंतरच सुनावणी होणार असल्याने निवडणुका निघाल्या असेच मत नोंदविण्यात आले. सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने त्याचे औचित्य साधून इच्छुक उमेदवारी मिळावी यासाठी जोर लावत आहेत.

भाजप लढणार स्वतंत्र
विधानसभा निवडणुकीत असलेली शिवसेनेसोबतची युती तुटल्याने यावेळी भाजप जिल्हा परिषद निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहे. सर्व 58 जागांवर भाजपचे उमेदवार उभे राहतील. भाजपने जिल्हा परिषदेसाठी जोरदार व्ह्यू रचना केली आहे. विधानसभा निवडणुकीत कामठी व हिंगणा मतदारसंघ कायम राखण्यात भाजप यशस्वी ठरली. येथील स्थानिक आमदार जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी व्हावेत यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहेत.

महाविकास आघाडी होणार?
राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. यामुळे स्थानिक निवडणुकातही महाविकास आघाडी व्हावी अशी आशा तिन्ही पक्षातील काही कार्यकर्त्यांना आहे. मात्र, अनेकांचा यास विरोध असल्याचे चित्र आहे. आघाडी झाल्यास स्थानिक कार्यकर्त्यांना नेतृत्त्व करण्याची संधी मिळत नाही, असाही एक प्रवाह आहे. जिल्ह्यात कॉंग्रेसचे दोन तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक व शिवसेनाप्रणित अपक्ष आमदार निवडून आले आहेत हे विशेष.

अनेक नवे चेहरे दिसणार
सात वर्षे कार्यकाळ भोगणाऱ्या जिल्हा परिषदेतील अनेक सदस्यांना आरक्षणाचा फटका बसला आहे. त्यांचे मतदारसंघ राखीव झाले आहेत. यामुळे त्यांना यावेळी संधी मिळणार नाही. त्याजागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. जिल्हा परिषदेत वजन ठेवणारे काही नेते त्यांचा मतदारसंघ बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पंचायत समिती गाजविल्यावर जिल्हा परिषदेचे राजकारण करण्याचीही अनेकांची इच्छा या निवडणुकीतून पूर्ण व्हावी यासाठी जुगाड करीत आहेत.

जिल्हा परिषदेत तब्बल साडे सातवर्षे सत्ताधाऱ्यांनी केवळ आपला विकास साधला. ग्रामीण भागातील जनतेला काय हवे, याची कोणतिही जाणीव त्यांना नव्हती. येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत विकासाला पूरक असलेल्या कॉंग्रेसचीच सत्ता येणार आहे.
- मनोहर कुंभारे, माजी विरोधी पक्ष नेते, जि.प.

जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्याने लोकशाहीचा विजय व जनतेला दिलासा मिळाला आहे. आता खऱ्या अर्थाने कामे होतील. प्रशासन वचकेत येईल. विषेश म्हणजे नवे लोक जिल्हा परिषदेत पोहचून विकास कामे करण्यासाठी जोर लावतील.
- संदीप सरोदे, माजी, सभापती. पं.स. काटोल.

नियोजित कालावधीपेक्षा जास्त वेळ जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांना मिळाला. त्यांच्याविषयी जनतेत काहीच आस्था नाही. आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. अनुभवाच्या आधारावर जनता नवे प्रतिनिधी निवडतील. शिवसेनेशिवाय कुणालाही सत्ता स्थापन करता येणार नाही.
- देवेंद्र गोडबोले, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com