नागपूर : महाराष्ट्र महिला प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी यवतमाळच्या संध्या सव्वालाखे यांची नियुक्ती झाली. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यानंतर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कोण, यावर पक्षात खल सुरू आहे. महिला प्रदेशाध्यक्षपद विदर्भाच्या वाट्याला दिल्यानंतर आता प्रदेश कॉंग्रेसचे दुसरे पद विदर्भाला मिळणार नाही, तर पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला जाईल, असे सांगितले जात आहे. पण कॉंग्रेसच्या विदर्भातील एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, प्रदेशाध्यक्ष विदर्भाचाच असणार आहे.
कॉंग्रेस जेव्हा जेव्हा अडचणीत सापडली तेव्हा विदर्भानेच पक्षाला भक्कम साथ दिली आहे. आणीबाणीनंतरही इंदिरा गांधी यांच्यासोबत विदर्भ ताकतीने उभा राहिला होता, हा इतिहास आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत कॉंग्रेसला मोठी मुसंडी मारायची आहे. त्यामुळे गटबाजीला आता कॉंग्रेसमध्ये थारा मिळणार नाही, असे सांगितले जाते. राज्यभर दांडगा जनसंपर्क करू शकणाऱ्या नेत्याला या पदावर विराजमान केले जाणार आहे. प्रदेश कॉंग्रेसची दोन पदे विदर्भाला मिळणार नाही, असे जरी बोलले जात असले तरी. यापूर्वी कॉंग्रेसने असा प्रयोग केलेला आहे. अशोक चव्हाणांच्या आधी माणिकराव ठाकरे प्रदेशाध्यक्ष होते. तेव्हा चारुलता टोकस या महिला प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्ष होत्या. त्यामुळे यावेळी महिला आणि पुरुष दोन्ही प्रदेशाध्यक्षपदं विदर्भाला मिळणार असल्याचा मार्ग मोकळा असल्याच्या चर्चेला बळ मिळते.
ओबीसींवरून वडेट्टीवार-ठाकरे आमने-सामने
कॉंग्रेसचा ओबीसी जनाधार घटला, असा दावा ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. १९९८ मध्ये ३८ टक्के ओबीसी समाज कॉंग्रेसच्या सोबत होता. नंतर नंतर ते प्रमाण कमी होत गेलं. आज १२ ते १४ टक्केच ओबीसी कॉंग्रेसच्या सोबत आहे. त्यामुळे पक्षासाठी ओबीसींची ताकद वाढवण्याची आज गरज आहे. त्या दिशेने आम्ही काम करत आहोत, असे वडेट्टीवार म्हणाले. पण माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी वडेट्टीवारांचा दावा खोडून काढला आहे. ते म्हणतात, कॉंग्रेसपासून ओबीसी समाज दुरावलेला नाही. सर्व समाजांना घेऊन चालणारा पक्ष कॉंग्रेस आहे. इतर पक्षांमध्ये जाती, धर्माच्या नावावर मते मागितली जातात. पण कॉंग्रेसमध्ये तसे होत नाही, असे ठाकरे म्हणाले. पक्षात असे विभिन्न मतप्रवाह असू नये, या विचारधारेवर काम करणारा प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल, असेही काहींचे म्हणणे आहे. प्रदेशाध्यक्षाच्या निवडीतून पक्षाला सामाजिक समतोल साधायचा असल्याचे सांगण्यात येते आणि याची सुरुवात विदर्भातून करण्याबाबतही पक्षपातळीवर विचारमंथन सुरू असल्याची माहिती आहे.

