विधानसभा अध्यक्षाची निवड केव्हा? : शिवसेना, राष्ट्रवादीकडून काॅंग्रेस `गॅस`वर

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत धुसफुस सुरू असल्याची टीका विरोधी पक्षाकडून केली जात आहे.
Sangram Thopte MLA
Sangram Thopte MLA

नागपूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभेचे अध्यक्षपद कॉंग्रेसच्या वाट्याला आलेलं आहे. नाना पटोले यांनी राजीनामा दिला आणि ते प्रदेशाध्यक्ष बनले, तेव्हापासून अध्यक्षपदाचे भिजत घोंगडे कायम आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसला तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप उद्या, ता. 9 मार्च रोजी होणार आहे. याच दिवशी अध्यक्षपदाची निवड व्हावी, यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांनी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. पण सहकारी दोन्ही पक्षाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने मोठी गोची झाली आहे. जर उद्या अध्यक्षपदाची निवडणूक होऊन नवीन अध्यक्ष निवडला गेला नाही, तर हिवाळी अधिवेशनापर्यंत ही निवड लांबण्याची दाट शक्यता आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात घ्यावी, अशी भूमिका कॉंग्रेसने मांडली. त्याला बैठकीत तरी प्रतिसाद मिळालेला नाही. पण आज रात्रीतून काय घडामोडी होतात, हे महत्वाचे ठरणार आहे.

अर्थसंकल्प, चर्चा आणि तो मंजूर करून घेणे, याला सरकारने प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादी सध्यातरी निवडणूक घेण्यास तयार नाही. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जेवढी लांबणीवर जाईल, तेवढेच आमचे नुकसान होणार असल्याचे कॉंग्रेसचे नेते खासगीत सांगतात. 

विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण, सुरेश वरपुडकर आणि संग्राम थोपटे यांच्या नावांची चर्चा आहे. चव्हाण यांना आसामच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसने छाननी समितीप्रमुख म्हणून नेमलेले आहे. ते सध्या तिकडेच व्यस्त असल्यामुळे उद्या जरी निवडणूक झाली तरी त्यांची येण्याची शक्यता फारच कमी आहे. संग्राम थोपटे यांना सरकार स्थापनेच्या वेळी मंत्रिपद द्यायचं जवळपास निश्‍चित झालं होतं. पण ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे आता त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे आणि त्यांच्या समर्थकांनाही यावेळी त्यांची अध्यक्षपदासाठी निवड होईल, असा ठाम विश्‍वास आहे. ही निवडणूक उद्याच व्हावी, यासाठी त्यांनीही आपल्या स्तरावर प्रयत्न चालविले आहेत.  

दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत धुसफुस सुरू असल्याची टीका विरोधी पक्षाकडून केली जात आहे. या निवडणुकीबाबत निर्णय घेताना तिन्ही पक्षांना याचाही विचार करावा लागणार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र बसून यावर तोडगा काढतील आणि कुठलाही गोंधळ न होऊ देता या अधिवेशनाचे सूप वाजण्यापूर्वीच विधानसभेचा अध्यक्ष निवडला जाईल, अशी अपेक्षा कॉंग्रेजनांना आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. पण पुढे नेमके काय होणार, यासाठी मात्र उद्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com