भाजपच्या तडाख्यात कॉंग्रेसची टीम सांभाळणारा शहराध्यक्ष कॉंग्रेसला मिळेल का ? - will the congress get the city president who is leading the congress in bjps blow | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

भाजपच्या तडाख्यात कॉंग्रेसची टीम सांभाळणारा शहराध्यक्ष कॉंग्रेसला मिळेल का ?

अतुल मेहेरे
गुरुवार, 1 एप्रिल 2021

या महिन्यात होऊ घातलेल्या शहर कॉंग्रेसच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर हा मोठा पेच उभा राहणार आहे. कॉंग्रेसमधील सर्व गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये ते कसा समतोल साधतात, हेही पाहणे महत्वाचे राहणार आहे.

नागपूर : महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशा राजकीय पक्षांत हालचालींनी वेग घेतला आहे. कॉंग्रेसमध्येही निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यातच कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांना बदलून नवीन शहराध्यक्ष नागपूरला देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. पण नागपूर शहर कॉंग्रेसवर विकास ठाकरेंची मजबूत पकड आहे. त्यांना डावलणे सोपे नाही. त्यांनी भाजपच्या तडाख्यात शहरात कॉंग्रेसची टीम सांभाळून ठेवली आहे. त्यांना जर बदलायचे असेल तर नवीन व्यक्ती त्यांच्यापेक्षा काकणभर सरसच असायला हवा. पण सध्यातरी असे एखादे नाव पुढे आलेले नाही. 

प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी जिल्हाजिल्ह्यांत बैठका घेणे सुरू केले आहे. कार्यकारिणी बदलण्याचे काम जोरात सुरू आहे. नागपुरातही याच महिन्यात बैठक होणार आहे. यामध्ये नवीन नावांची चाचपणी होणार आहे. नाना पटोलेंच्या कामाचा झंझावात जबरदस्त आहे. निर्णयक्षमता चांगली आहे, किंबहुना त्यासाठीच ते ओळखले जातात. नानांनी स्वतः येथून भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. कॉंग्रेसच्या नागपुरातील सर्वच नेत्यांचा तेव्हा त्यांना अभ्यास झालेला आहे. त्यामध्ये विकास ठाकरे यांचाही समावेश आहे. त्यामुळे नाना आता नागपूरचे शहराध्यक्ष बदलतील की विकास ठाकरे यांच्यावर महानगरपालिकेची धुरा सोपवतील, याबद्दल शहरातील नेते, कार्यकर्ते अंदाज लावत आहेत. 

विकास ठाकरे १९८५ पासून कॉंग्रेसमध्ये आहेत. १७ वर्षांनंतर २००२ ला पक्षाने त्यांना तिकीट दिली. तीसुद्धा अपक्ष लढून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्यांनी १५०० मत घेतले होते तेव्हा. त्यानंतर त्यांनी महानगरपालिकेत कामांचा झंझावात लावला. नागपूरच्या यशस्वी महापौरांच्या यादीमध्ये त्यांचे नाव आहे. त्यानंतर त्यांनी भाजपचा आमदार असलेला नागपूर पश्‍चिम हा मतदारसंघ खेचून आणला. कॉंग्रेसचे आमदार आणि शहराध्यक्ष या दोन्ही जबाबदाऱ्या ते समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्या शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ ८ वर्षांचा झाला आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीला किती वर्ष अध्यक्ष ठेवणार, इतरांना संधी मिळणार की नाही, असे प्रश्‍न कार्यकर्त्यांमधून उठू लागले आहेत. 

२०१४ मध्ये नरेंद्र मोदींची लाट देशात आली. त्यात झाडून सारे पक्ष वाहून गेले. त्याही परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात विकास ठाकरेंनी कॉंग्रेस तुटू दिली नाही. शहरातील कार्यकर्त्यांना इतरत्र फटकू दिले नाही. आजही शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसची टीम त्यांनी टिकवून ठेवली आहे. इतके वर्ष प्रतिकूल परिस्थितीत अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे काम केल्यानंतर ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अध्यक्षपदावरून हटवणे योग्य आहे का, असा सवाल त्यांचे समर्थक विचारत आहेत. 

या महिन्यात होऊ घातलेल्या शहर कॉंग्रेसच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर हा मोठा पेच उभा राहणार आहे. कॉंग्रेसमधील सर्व गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये ते कसा समतोल साधतात, हेही पाहणे महत्वाचे राहणार आहे. चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी डॉ. नितीन राऊत आणि सतीष चतुर्वेदी यांच्या समर्थकांना कार्यकारिणीतून डावलले होते. त्याचाही प्रभाव बैठकीत दिसणार आहे. विकास ठाकरेंना बदलून नवीन अध्यक्षाची निवड करतात, की महापालिकेची जबाबदारी त्यांनाच देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा : गुंड रणजीत सफेलकरला अनवाणी फिरवले, निमगडे हत्याकांडातील मोठे मासे अडकणार...

कार्यकर्ते झाले सक्रिय
महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्ते सक्रिय होऊ लागले आहेत. प्रत्येक जण आपआपल्या गटात कार्यरत आहे. तिकीट मिळेल याची कोणालाच शाश्वती नाही. त्यामुळे प्रत्येक जण सावध पाऊल टाकत आहे. अनेकजण गटबाजीचा ठप्पा लागू नये म्हणून शांत बसला आहे. नाना पटोले यांनी लवकरात लवकर बैठक घेऊन नवीन कार्यकारिणी स्थापन केल्यास मोकळेपणा आणि उघडपणे काम  
करता येईल, अशी त्यांची भावना आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख