नागपूर : नागपुरच्या विधान भवनात विधिमंडळ सचिवालयाचे कक्ष केवळ नावापुरतेच सुरू करण्यात आले. कारण या कक्षाचे उद्घाटन झाल्यापासून राज्यातील एकही मंत्री इकडे फिरकले नाहीत. त्यामुळे येथे कक्ष सुरू केलेच कशाला, असा प्रश्न नागपूरकर विचारत आहेत. उद्या नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबत निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार उद्या नागपुरात येत आहेत. ते बैठक विधान भवनात घेऊन खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांच्या अपेक्षा पूर्ण करतील का, असा प्रश्न नागपूरकर विचारत आहेत.
अजितदादांनी उद्या विधानभवनात बैठक घेतल्यास विधान भवनात बैठक घेणारे पहिले मंत्री ठरल्याचा मान त्यांना मिळेल. शिवाय कक्षालाही न्याय मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे. नागपूर आणि मुंबई यांचे नाते अधिक दृढ करण्यासाठी नागपुरातील विधान भवनात विधिमंडळ सचिवालयाचे कक्ष सुरू करण्यात आले. परंतु गेल्या महिनाभरात अध्यक्ष, उपाध्यक्षासह एकाही मंत्र्यांनी सचिवालयाला भेट दिली नाही. त्यामुळे कक्ष फक्त नावापुरताच असल्याचे दिसतेय. भाषावार प्रांताची निर्मिती करताना मध्य प्रांताचा भाग असलेला विदर्भ प्रदेश महाराष्ट्रात सामील करण्यात आला. नागपूर करार करताना नागपूरला उपराजधानीचा दर्जा मिळाला. त्याचप्रमाणे राज्याचे एक अधिवेशन नागपूरला घेण्याचे निश्चित करण्यात आले. याच्या माध्यमातून संपूर्ण सरकारच मुंबईवरून नागपूरला येते.
काहीच दिवस अधिवेशन चालत असून फारसे काही विदर्भाच्या वाट्याला येत नसल्याचे आरोप झाले आणि आजही होत आहेत. विदर्भाला सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याचीही टीका झाली आहे. विधान भवन असतानाही प्रत्येक कामासाठी मुंबईला जावे लागते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील विधान भवनात सचिवालयाचे कक्ष सुरू केले. ‘विधिमंडळ सचिवालयाचे कक्ष वर्षभर सुरू राहणार असून आता खऱ्या अर्थाने नागपूर आणि मुंबई यांचे नाते अधिक दृढ झाले’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्घाटनप्रसंगी म्हणाले होते.
सर्व मंत्री, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी महिन्यातून किमान एकदा सचिवालयात बसून काम करण्याची अपेक्षा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली होती. परंतु गेल्या महिनाभरात एकही मंत्री सचिवालयाकडे भटकले नाहीत. स्वतः झिरवाळसुद्धा आले नाहीत. काही मंत्री नागपूरला आले. त्यांच्यासह नागपूरला राहत असलेल्या मंत्र्यांनीही विविध कामांबद्दल आढावा घेतला. परंतु सचिवालयात एकही बैठक घेतली नाही. त्यामुळे अद्याप मुंबई आणि नागपूरचे नाते दृढ झाले नसल्याचे दिसते. कक्ष सुरूच कशाला केला, असा सवाल नागपूरकर विचारत आहेत.
Edited By : Atul Mehere

