काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नानाच का ?  - why nana as the state president of the congress | Politics Marathi News - Sarkarnama

काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नानाच का ? 

अतुल मेहेरे
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

नितीन गडकरींच्या विरोधात येथे ते लढूच शकणार नाहीत, नानांनी माघार घ्यावी, ही निवडणूक एकतर्फी होईल, असे बोलले जात होते. पण केवळ पक्षाने आदेश दिला म्हणून कसेतरी लढायचे, असे न करता नाना संपूर्ण ताकतीनीशी मैदानात उतरले आणि लढतीत रंग भरला.

नागपूर : महिला प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्षपद विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला दिल्यानंतर मुख्य प्रदेशाध्यक्ष विदर्भाचा होणार नाही, असा सूर आवळला गेला होता. पण हो-नाही करता करता महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्षपद विदर्भाला मिळाले. याची कारणेही निरनिराळी आहेत. या पदासाठी राज्यातील पाच-सहा नावांवर खल झाल्यानंतर आक्रमक शेतकरी नेते, नाना पटोले यांनाच प्रदेशाध्यक्षपदी का नेमण्यात आले, असा प्रश्‍न अनेकांना पडला असेल. या प्रश्‍नाचे उत्तर शोधताना काही बाबी ठळकपणे लक्षात येतात. 

कॉंग्रेसमधील दुसरी इनिंग 
नाना पटोलेंची कॉंग्रेसमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये त्यांना फारसे काही मिळाले नव्हते. तेव्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला, भंडारा-गोंदीया लोकसभा मतदारसंघातून लढले आणि खासदार झाले. पण कॉंग्रेसमधून गेलेले नाना भाजपच्या संस्कृतीमध्ये फारसे रुळले नाहीत. शेतकऱ्यांच्या मुद्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचे वाजले आणि त्यांना तडक राजीनामा फेकून मारला. त्यानंतर पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले. गुजरातमध्ये राहुल गांधींच्या सभेमध्ये त्यांनी कॉंग्रेस प्रवेश केला. येथून त्यांची दुसरी इनिंग सुरू झाली. मोदींच्या विरोधात तेव्हा भाजपमधीलच काय पण विरोधी पक्षांतील लोकसुद्धा काही बोलायला धजत नसत, त्या काळात नानांनी मोदींशी पंगा घेतला होता. त्यामुळेच पक्षश्रेष्ठींच्या नजरेत ते भरले आणि त्यांना अखिल भारतीय किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले. विदर्भाने कॉंग्रेसला नेहमीच साथ दिली आहे. त्यामुळे महिला आणि पुरुष दोन्ही प्रदेशाध्यक्षपदे कॉंग्रेसला देण्याचे श्रेष्ठींनी आधीच निश्‍चित केले होते. पण नानांमधील काही विशेष गुणांमुळे त्यांची या पदावर निवड झाल्याचे मानन्यात येते. 

मापदंडात चपखल बसले 
कॉंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होण्याऱ्या व्यक्तीमध्ये पुढील गुण असावे, असे सांगितले जाते. ते म्हणजे, पक्षासाठी निधी संकलन करण्याची क्षमता, पक्षश्रेष्ठींशी जवळीक, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांशी जुळवून घेण्याची हातोटी, विरोधकांवर प्रहार करण्याची आक्रमकता. या सर्व मापदंडात नाना चपखल बसतात. दुसरं म्हणजे, आतापर्यंत कुठल्याही घोटाळ्यात त्यांचे नाव आलेले नाही. महाविकास आघाडीतील दोन्ही सहकारी पक्षांना सोबत घेऊन चालण्याचे कौशल्य त्यांच्यात आहे. तडजोड करताना प्रसंगी ते आक्रमकही होतात. भाजपमध्ये थेट मोदींशीच त्यांनी पंगा घेतला होता. भाजपबद्दल त्यांना चीड आहे. त्यांची अत्याचारी विचारधारा आहे, असे नाना नेहमी म्हणतात. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना विरोधी पक्ष भाजपवर ते भरपूर प्रहार करु शकतात. 

विधानसभा अध्यक्ष म्हणून झाले लोकप्रिय 
विधानभेचे अध्यक्षपद नानांनी निमूटपणे स्विकारले. तेव्हाही प्रदेशाध्यक्ष होण्याची त्यांची सुप्त ईच्छा होतीच, असे बोलले जात होते. तरीही त्यांनी दिलेली जबाबदारी स्विकारली आणि समर्थपणे सांभाळली. निवृत्तीच्या वाटेवर आलेल्या नेत्यांना विधानसभेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष बनवले जाते, अशी धारणा आत्ता आत्तापर्यंत होती.  

हेवीवेट नेते गडकरींना दिली होती टक्कर 
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत श्रेष्ठींनी भाजपचे लोकप्रिय केंद्रीय मंत्री, हेवीवेट नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात लढण्यासाठी नानांना नागपुरात पाठवले. हे आव्हानही त्यांनी स्विकारले आणि नागपुरच्या मैदानात उतरले. नितीन गडकरींच्या विरोधात येथे ते लढूच शकणार नाहीत, नानांनी माघार घ्यावी, ही निवडणूक एकतर्फी होईल, असे बोलले जात होते. पण केवळ पक्षाने आदेश दिला म्हणून कसेतरी लढायचे, असे न करता नाना संपूर्ण ताकतीनीशी मैदानात उतरले आणि लढतीत रंग भरला. भाजपच्या खेम्यात काही काळ त्यांनी अस्वस्थता निर्माण केली होती. जिंकले नाही, पण हेवीवेट नेते गडकरींनी चांगलीच टक्कर दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख