शरद पवार केंद्रावर टीका करत असतानाच फडणवीस महाआघाडीला झोडत होते...

मुंबईत शरद पवार केंद्र सरकारवर तुटून पडले, तर फडणवीसांनी भंडाऱ्यात राज्य सरकारवर आग ओकली. त्यामुळे दोन्ही नेते पुन्हा आमनेसामने आले.
Sharad Pawar - Devendra Fadanvis
Sharad Pawar - Devendra Fadanvis

नागपूर : मुंबईच्या आझाद मैदानातून राजभवनावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित मोर्चा नेण्यात आला. तर इकडे विदर्भाच्या भंडारा येथे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चा काढला. विशेष म्हणजे हे दोन्ही मोर्चे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आले. केंद्राचे शेतकरी कायदे कसे नुकसानकारक आहेत, यावर पवारांनी बॅटिंग केेली तर हे कायदे शेतकऱ्यांचे कसे हिताचे आहेत, हे फडणवीस यांनी आक्रमकपणे सांगितले.

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या मोर्चात महाविकास आघाडीतील दोन्ही काॅंग्रेसचे  प्रमुख नेते सहभागी झाले होते. शिवसेना नेते यात सहभागी नव्हते, याचीही वेगळी नोंद राजकीय विश्लेषकांनी घेतली. आझाद मैदानावरील सभा आटोपल्यानंतर मोर्चाने राजभवनावर जाऊन राज्यपालांना निवेदन देण्याचे नियोजन मोर्चेकऱ्यांनी केले होते. पण राज्यपाल गोव्याला निघून गेल्याने शिष्टमंडळाची भेट झाली नाही.

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यासाठी राज्याच्या राज्यपालाजवळ वेळ नाही काय, असा सवाल करीत पवारांनी राज्यपालांवर तोफ डागली. राज्याच्या इतिहासात असे राज्यपाल महाराष्ट्राला मिळालेले नाही, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करताना पवार म्हणाले की, शेती कायदा करणाऱ्या समितीमध्ये सर्व पक्षांचे लोक असतात. करावयाच्या कायद्यावर सांगोपांग चर्चा होते. पण येथे केंद्र सरकारने कुठलीही चर्चा न करता कायदा अस्तित्वात आणला. पंतप्रधानांनी संसदीय पद्धतच उद्धवस्त केली. हा घटनेचा अपमान आहे. जे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांना आता लोक रस्त्यावर उतरून उद्ध्वस्त करतील, असा घणाघात पवार यांनी केला.  

इकडे पूर्व विदर्भाच्या भंडारा जिल्ह्यातून राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात आणि येथील रुग्णालयात दहा बालकांच्या मृत्यूच्या निषेधार्थ फडणवीस यांनी मोर्चा काढला. राज्य सरकारवर हल्लाबोल करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ``महाराष्ट्रातील सत्ताधारी शेतकऱ्यांना भरकटवत आहेत. धान खरेदी केंद्रांवरील भ्रष्टाचार बाहेर आला, तर भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अर्धे नेते तुरुंगात जातील. सत्तापक्षातील नेते आणि त्यांच्या चेले चपाट्यांनी धान खरेदी केंद्रांवरून मोठा मलिदा लाटला आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मानवतेला लाजवणारी घटना घडली. पण सरकारने त्यावर केवळ थातूरमातूर कारवाई केली. आम्ही मोर्चा घोषीत केल्यावर अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. १० नवजात बालके आगीत होरपळून, गुदमरून मरण पावली, त्यांच्या मातापित्यांचे अश्रू अजून सुकलेले नाहीत. अन् महाराष्ट्र सरकारची अवस्था इतकी काही वाईट नाही, की त्यांना १०-१० लाख रुपयेही नाही देऊ शकणार. त्या मातांच्या, शेतकऱ्यांच्या  संवेदना हे सरकार समजू शकणार नाही. हे बेईमानांचं सरकार जोपर्यंत हटणार नाही, तोपर्यंत आमचा संघर्षही संपणार नाही, असे फडणवीस म्हणाले. 

विदर्भातील धान खरेदीतील घोटाळ्याचा आरोप करत त्यात कारवाई झाली तर सत्ताधारी पक्षाचे अनेक नेते तुुरंगात जातील, असा इशारा देत फडणवीस यांनी माध्यमांना `हेडलाईन`ही दिली. त्यामुळे या दोन नेत्यांचे एकाच दिवशी एकाच प्रश्नावर आमने-सामने येणे राजकीय चर्चा घडवून गेेले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com