नाना पटोलेंसाठी कॉंग्रेसचा कोणता मंत्री देणार बलिदान ?  - which congress minister will sacrifice for nana patole | Politics Marathi News - Sarkarnama

नाना पटोलेंसाठी कॉंग्रेसचा कोणता मंत्री देणार बलिदान ? 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 8 मार्च 2021

विदर्भातील कॉंग्रेसच्या मंत्र्यांचा विधानसभेचे अध्यक्षपद स्वीकारण्यास विरोध आहे. 

नागपूर : नाना पटोले विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मोकळे झाले. त्यानंतर त्या पदाचा तिढा अद्याप सुटला नाही. पुणे जिल्ह्यातील आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू असली तरी, नाना पटोलेंना मंत्रिपद हवे आहे. राजीनामा देताना त्यांना तशी ‘कमीटमेंट’ दिल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेसच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. पण नाना पटोलेंसाठी राज्यातील कोणता मंत्री बलिदान देणार किंवा श्रेष्ठी कुणाला बळीचा बकरा बनवणार, ही चर्चा जोरात सुरू आहे.

प्रदेशाध्यक्षाकडे मंत्रिपद असू नये, त्याने पूर्णवेळ पक्षसंघटना मजबूत करण्याचे काम करावे, असे मानणारा एक वर्ग पक्षात आहे. तर प्रदेशाध्यक्षाला कार्यकर्त्यांचे संघटन करताना राज्यभर फिरावे लागते. मेळावे, बैठका घ्याव्या लागतात. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्‍यकता असते. त्यामुळे प्रदेशाध्यक्षाकडे मंत्रिपद आणि तेही ‘ऊर्जावान’ असावे, असे मानणारा दुसरा वर्ग आहे. नानांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून त्यांनाही मंत्रिपदाची प्रतीक्षा आहे. पण त्यांना मंत्रिपद द्यायचे, तर बलिदान कोण देणार किंवा पक्षश्रेष्ठी कुणाचा बळी देणार, यावर पक्षात विविध चर्चांनी जोर पकडला आहे. कुणीही असो पण बकरा (की बकरी) विदर्भातलाच असेही अशीही माहिती आहे.  

पुणे जिल्ह्यातले आमदार संग्राम थोपटे प्रदेशाध्यक्ष होतील, अशीही चर्चा राज्यात सुरू आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद पश्‍चिम विदर्भाकडेच असावे, यासाठी महाविकास आघाडीतील काही नेते प्रयत्नांत असल्याचीही माहिती आहे. पण महिला प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्षपद विदर्भाला दिल्यानंतर दुसरे अध्यक्षपदही श्रेष्ठींनी विदर्भालाच दिले. त्यामुळे विदर्भाकडून श्रेष्ठींना अधिक अपेक्षा आहे. असे असल्यास संग्राम थोपटेंचा पत्ता पुन्हा एकदा कटल्यास नवल वाटायला नको. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा विदर्भातून सुरू करून विदर्भाची ताकत काय आहे, हे जाणले आणि यात्रेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ पिंजून काढला. दरम्यानच्याच काळात कॉंग्रेसनेही आपला मोर्चा विदर्भाकडे वळवला. नाना पटोलेंनी भंडारा ते लाखनी ट्रॅक्टर मोर्चा काढून आपले इरादे स्पष्ट केले. 

प्रदेशाध्यक्षपद विदर्भाला दिले तर मग मंत्रिपदही विदर्भाच्याच एखाद्या नेत्याचे काढून ते नानांना द्यायचे, असाही एक मतप्रवाह कॉंग्रेसमध्ये आहे. विदर्भातील कॉंग्रेसच्या मंत्र्यांचा विधानसभेचे अध्यक्षपद स्वीकारण्यास विरोध आहे. त्यामुळे आता नाना पटोले आणि मंत्रिपद, यावरून कॉंग्रेसमध्ये पुन्हा गट, तटाच्या भानगडी तर होणार नाहीत ना, अशीही भिती काहींना आहे. या नाटकाचा अंक उद्या होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. जर उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि अध्यक्ष निवडला गेला, तर बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल, संग्राम थोटपे अध्यक्षपदी विराजमान झाले. तर उरतो तो नानांच्या मंत्रिपदाचा तिढा. पण विधानसभेचे अध्यक्षपद जर विदर्भातील कॉंग्रेसच्या मंत्र्याला द्यायचे झाले, तर काय पुढे काय होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख