हे काय?, नागपूर मेट्रोत खेळला गेला जुगार... - what is this gambling is played in nagpur metro | Politics Marathi News - Sarkarnama

हे काय?, नागपूर मेट्रोत खेळला गेला जुगार...

अतुल मेहेरे
गुरुवार, 21 जानेवारी 2021

काल सायंकाळी मेट्रोत जुगार खेळला गेल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे ही बाब उघडकीस आली. पण इतर वेळीही ‘सेलीब्रेशन’च्या नावाखाली मेट्रोमध्ये अशीच कामे चालत असतील. कारण तेथे कुणालाही कशाचीही रोकटोक नव्हती.

नागपूर : नागपूर मेट्रो सुरू झाली तेव्हापासून काही ना काही वादात घेरली जात आली आहे. कधी भ्रष्ट्राचाराचे आरोप, तर कधी सुरक्षा रक्षकांचे वेतन देण्यावरून मेट्रोचे वाद पुढे आले आहेत. आता मेट्रो चर्चेत आली आहे ती वेगळ्याच कारणाने. नागपुरातील एका व्यक्तिचा काल वाढदिवस होता. तो मेट्रोमध्ये साजरा करण्यात आला. पण यावेळी मेट्रोमध्ये काही जण जुगार खेळताना आढळले.

सायंकाळी ६ वाजता बर्डी ते लोकसेवानगर या प्रवासासाठी मेट्रो बुक करण्यात आली होती. वाढदिवसाचा कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा केला जात होता. केक कापला जात होता, गाणे, नाचणे सुरू होते. मात्र त्याचवेळी दुसरीकडे काही जण जुगार खेळत होते. मेट्रोमध्ये सुरक्षा रक्षक असूनसुद्धा त्यांना कुठलीही रोकटोक केली जात नव्हती. त्यामुळे मेट्रोमध्ये कुठलाही कार्यक्रम करताना हे सर्व ‘परमीसीबल’ आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. एखादा कार्यक्रम साजरा करण्यासाठी मेट्रो बुक करायची आणि मग रेल्वेत वाट्टेल ते करायचे, असाच संदेश गेल्या काही दिवसांमध्ये नागपुरात प्रसारित होतो आहे. 

मेट्रोला प्रवासी मिळावे म्हणून प्रशासनातर्फे नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये वेडींग शुट्स, हळदी कुंकू आणि वाढदिवस साजरे करण्यासाठी नागपुरकरांना मेट्रो उपलब्ध करून दिली जाते. असाच एक वाढदिवस काल सायंकाळी मेट्रोमध्ये साजरा करण्यात आला. मनोरंजनासाठी कुटुंबीयांनी पत्ते खेळणे समजले जाऊ शकते. पण काल चक्क पैसै लावून जुगार खेळला गेला. त्यामुळे असे धंदे करण्यासाठी ही मेट्रो आहे का, असा सवाल नागपुरकर विचारत आहेत. यावेळी तेथे उपस्थित काही जण म्हणाले, मेट्रो कर्मचाऱ्यांचे पगार एका खासगी कंपनीमार्फत करण्यात येतात. कर्मचाऱ्याला जर १८-१९ हजार रुपये पगार असेल तर ही कंपनी त्यांना सद्यःस्थितीत १३ हजार रुपयेच देते. उर्वरित ६ हजार रुपये कंपनीच्या खिशात जातात. कर्मचाऱ्यांची सर्रास लूट केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. 

काल सायंकाळी मेट्रोत जुगार खेळला गेल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे ही बाब उघडकीस आली. पण इतर वेळीही ‘सेलीब्रेशन’च्या नावाखाली मेट्रोमध्ये अशीच कामे चालत असतील. कारण तेथे कुणालाही कशाचीही रोकटोक नव्हती. सुरक्षा रक्षक होते, सीसी टीव्ही कॅमेरेही लागलेले आहेत. पण जुगार खेळणाऱ्यांना कुणीही रोखले नाही. मेट्रोमध्ये नेहमीच अशी कामे होत असावी, असे नागरिक बोलत आहेत. मेट्रो प्रवाशांसाठी की हुल्लडबाजी करणाऱ्यांसाठी, असाही प्रश्‍न विचारला जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख