खुलासे काय करता, नागपूरकरांना वैद्यकीय उपचार मिळवून द्या; उपकाराची भाषा करू नका... - what do the revelations do get medical treatment to nagpurkars do not use the language of gratitude | Politics Marathi News - Sarkarnama

खुलासे काय करता, नागपूरकरांना वैद्यकीय उपचार मिळवून द्या; उपकाराची भाषा करू नका...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

काल एनसीआयमध्ये २०० बेड्स उपलब्ध असल्याचे सांगत त्याचे उद्घाटन केले. पण आज लोकांनी तेथे कॉल करून बेड्सची मागणी केली असता, किमान चार ते पाच दिवस बेड्स उपलब्ध होणार नाही, असे अगदी निर्विकारपणे लोकांना सांगण्यात आले. काय फायदा झाला त्या उद्धाटनाचा, असा घणाघाती सवालही अतुल लोंढे यांनी  
विचारला आहे. 

मुंबई : नागपूरमध्ये कोरोना महामारीची भयानक परिस्थिती असताना भाजपाशासीत महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याचे वास्तव काँग्रेसने कालच मांडले. योग्य अंमलबाजवणीअभावी नागपूरची जनता होरपळत आहे. संकट गंभीर असताना शहरातील भाजपच्या दोन बड्या व महत्वाच्या नेत्यांनी नागपूरकरांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळवून द्याव्या, ही रास्त अपेक्षा आहे. परंतु भाजपाचे नेते खुलासे कसले करत आहेत. लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे. त्यांना सुविधा पुरवणे तुमचे कर्तव्यच असताना उपकाराची भाषा कसली करता? नागपूरकरांना बेड्स व योग्य त्या वैद्यकीय सुविधा पुरवा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अतुल लोंढे यांनी सुनावले आहे.

अतुल लोंढे यांनी नागपूर महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा पर्दाफाश कालच केला होता, त्यावर भाजपकडून न पटणारे खुलासे केले गेलेत. वास्तविक पाहता अशा गंभीर संकटाच्या वेळी नागपूरकरांचे जीवन सर्वात महत्वाचे आहे आणि दोन एवढे मोठे नेते असताना अशा अडचणी निर्माण होऊच नये, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. वस्तुस्थिती अशी की, महापालिकेला आपली स्वतःची आरोग्य व्यवस्था खाजगी डॉक्टरांना चालवण्यास देण्याची वेळ का आली, याचे उत्तर मिळेल का? नागपूरमध्ये १० झोन आहेत आणि योग्य पद्धतीने ट्रेसिंग न केल्यानेच कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढले, त्याचे काय?

भाजपाने असा दावा केला आहे की, भिलाई स्टील प्लॅंट वरून ऑक्सिजन उपलब्ध करून दिले. पण वास्तविक परिस्थिती अशी आहे की, या संबंधात राज्य सरकारच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आदित्य एअर प्रॉडक्ट यांच्या मध्यमातून आपण ऑक्सिजन घेत आहोत. आपण रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आहात. जे टँकर उपलब्ध करून दिले, असा दावा आपण करता ते अपुरे आहेत. आपल्याकडेच हे मंत्रालय असताना नागपूरवर ही वेळ येत असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे. आपण सन फार्माच्या मालकाशी बोलून १० हजार रेमडेसिव्हिरचे डोसेस नागपूरला उपलब्ध करून दिले असे सांगितले. पण आजपर्यंत त्यातील डोसेस का आले नाहीत? आज नागपूरची दररोजची गरज १३ हजार डोसेसची असताना प्रत्यक्षात आजही अपुरा पुरवठा का? आपल्या हेल्पलाईनवर मदत मागितली असता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बोट दाखवले, याचे रेकॉर्डिंग एका गरजवंताकडे आहे.

आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर त्याचा अहवाल मिळण्यास ५ ते १० दिवस लागतात आणि त्यादरम्यान रुग्णांची प्रकृती खालावते ही वस्तुस्थिती आहे. नागपूरच्या जनतेने आपल्या नेतृत्वाकडे पाहून १५ वर्षांपासून भाजपाला महापालिकेची सत्ता दिली त्यामुळे लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन परिस्थिती चिघळू नये, यासाठी आपण स्वतः हस्तक्षेप करून हे प्रश्न मिटवावेत आणि नागपूरकरांच्या समस्या सोडवाव्यात. कोरोनामुळे नागपूरची झालेली विदारक परिस्थिती काँग्रेसने मांडल्यानंतर फडणवीस व गडकरी यांना जाग आली आहे, आता केवळ घोषणा करण्यापेक्षा कृती करून नागपूरकरांना दिलासा द्यावा.

हेही वाचा : गडकरींनी त्यांच्या स्टाईलने उदघाटन केले... पण बेड काही उपलब्ध नाही झाले...

नागपूरच्या आरोग्य व्यवस्थेची लक्तरे काँग्रेसने वेशीवर टांगल्यानंतर एक हजार व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्याची घोषणा केल्याचे कळते. हे व्हेंटिलेटर्स तरी लवकर मिळावेत अन्यथा याचीही अवस्था रेमडेसिव्हिरच्या घोषणेसारखी होऊ नये. काँग्रेसने जाब विचारताच आपण हातपाय हलवण्यास सुरुवात केली तेच आधी केले असते तर नागपूरकरांवर ही वेळ आली नसती. या संकटसमयी राजकारण करू नये, अशी आमची अपेक्षा आहे पण दर पावसाळ्यात पक्ष बदलणारे, असा माझा उल्लेख केला पण आपल्या पक्षातच अशा दलबदलूंची भरमार झाली आहे, हे आपण विसरलात आणि आज केलेल्या घोषणाही पावसाळ्यातील घोषणांसारख्या पाण्यात वाहून जावू नयेत एवढीच अपेक्षा, असेही लोंढे म्हणाले.

काल एनसीआयमध्ये २०० बेड्स उपलब्ध असल्याचे सांगत त्याचे उद्घाटन केले. पण आज लोकांनी तेथे कॉल करून बेड्सची मागणी केली असता, किमान चार ते पाच दिवस बेड्स उपलब्ध होणार नाही, असे अगदी निर्विकारपणे लोकांना सांगण्यात आले. काय फायदा झाला त्या उद्धाटनाचा, असा घणाघाती सवालही अतुल लोंढे यांनी  
विचारला आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख