भंडारा : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यातील अधिकारी आणि कर्मचारी येथील विश्रामगृहावर सोमवारी चिकन, मटण आणि झिंग्यांवर ताव मारतानाचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर मंगळवारी व्हायरल झाले होते. त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. त्यावर आम्ही ‘मिक्स व्हेज, वांग्याचे भरीत, दाल तडका, भात, भाकरी आणि पोळ्या’, असे जेवण बनवायला सांगितले असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनीषा कुरसुंगे यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.
विश्रामगृहावर मंत्री यशोमती ठाकूर आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्वांची जेवण्याची व्यवस्था केली होती. पण मंत्री ठाकूर येथे जेवल्या नाहीत, असेही मनीषा कुरसंगे म्हणाल्या. प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे कार्यकारिणी सदस्य जिया पटेल यांच्या घरी त्यांनी जेवण केल्याची माहिती आहे. भंडारा जिल्हा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी पहाटे आग लागून १० नवजात बालक मरण पावल्यानंतर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयाला भेट देऊन मृत बालकांच्या माता-पित्यांचे सांत्वन केले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या सर्व स्टाफच्या जेवणाची व्यवस्था विश्रामगृहावर करण्यात आली होती. तेथे मटण, देशी कोंबडे आणि झिंगे असा बेत आखलेला होता. सर्व स्टाफने जेवणावर ताव मारला. पण कुणीतरी त्याचा व्हिडिओ तयार केला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सोशल मिडियावर अपलोड केला. त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली.
राज्यातील कोणताही मंत्री जिल्ह्याच्या दोऱ्यावर आला की संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी मंत्र्यांसोबतच त्यांच्या पीएंची देखील बडदास्त ठेवण्यात कुठलीही कसर बाकी ठेवत नाहीत. येवढेच काय तर मंत्र्यांच्या वाहनचालकांची देखील ‘हाजी हाजी’ केली जाते. एरवी हे सर्व ठीक आहे, पण नुकतीच भंडाऱ्यात कोणती घटना घडली, त्यानंतर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यात आणि संपूर्ण देशात काय वातावरण आहे, याचेही भान ठेवले गेले पाहिजे. रुग्णालयांची काय अवस्था आहे, मृतक बाळांच्या घरी काय परिस्थिती आहे, याची पाहणी करण्यासाठी आणि पीडितांचे सांत्वन करण्यासाठी राज्यातील मंत्री येत आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे क्रमप्राप्त आहे. पण त्यांच्या जेवण्यासाठी काय मेन्यू असला पाहिजे, याचा विचार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे.
आम्ही साधे जेवण तयार करण्यासाठी सांगितले होते, असे बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनीषा कुरसुंगे यांनी सांगितले. मग प्रश्न उरतो की मांसाहारी जेवणाची व्यवस्था केली कुणी? या प्रश्नाचे उत्तर सापडेपर्यंत तरी हा विषय धुमसत राहणार, असेच एकंदरीत परिस्थितीवरून दिसतेय.
Edited By : Atul Mehere

