कारभारींचे कारभारी लईच भारी, दाव्या-प्रतिदाव्यांनी वाढवला संभ्रम.. - The stigma attached to the stewardship increased the confusion | Politics Marathi News - Sarkarnama

कारभारींचे कारभारी लईच भारी, दाव्या-प्रतिदाव्यांनी वाढवला संभ्रम..

राजेश चरपे
सोमवार, 18 जानेवारी 2021

प्रत्येक पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविली होती. महाविकास आघाडीची एकत्रित आकडेवारी बघितल्यास ९३ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात महाघाडीचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट होते. या आकडेवारीनुसार भाजपच्या वाट्याला फक्त ३४ जागा येतात.

नागपूर : ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाल्यावर दुपारपासूनच दावे प्रतिदावे ठोकणे सुरू झाले आहे. कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आपणच जास्त जागा जिंकल्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे संभ्रम वाढला आहे. नेत्यांना दावे केल्यामुळे काही गावांत कार्यकर्त्यांमध्ये जुंपल्याचेही बघायला मिळत आहे. त्यामुळे गावगड्यांचे कारभारी भारी, अन् या कारभारींचे कारभारी लईच भारी, अशी चर्चा रंगली आहे. 

ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले असून आपणच सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा काँग्रेस आणि भाजपच्यावतीने केला जात आहे. त्यात राष्ट्रवादी, शिवसेना यांची आकडेवारी धरल्यास सुमारे १७० ग्रामपंचायतींवर दावेदारी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात १२७ ग्राम पंचायतीमध्येच निवडणूक झाली आहे. काँग्रेसच्या दाव्यानुसार ८३ तर भाजपने ७३ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे. 

जिल्ह्यातील १३० ग्राम पंचायतींच्या निवडणूक जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यांपैकी एका ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द झाली तर दोन ग्रामपंचायतींमध्ये अविरोध निवडणूक झाली. त्यामुळे प्रत्यक्षात १२७ ग्राम पंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी काँग्रेसने ८३ जागा जिंकल्याचा दावा केला आहे. आपल्याकडे प्रत्येक तालुक्यानुसार आकडेवारी उपलब्ध आहे. जिथे पराभव झाला, ते आम्ही मान्य केले आहे, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी ७३ जागा जिंकल्याचा दावा केला आहे. 

काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये २२ पैकी ९, रामटेकमध्ये २० पैकी ६, उमरेड ४१ पैकी ३२, हिंगणा १० पैकी ३ जागांवर भाजपला स्पप्ट बहुमत मिळाल्याचे म्हटले आहे. सोबतच काही ग्रामपंचायतींवर अपक्षांच्या मदतीने भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे गजभिये यांनी सांगितले. दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रसने काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातील नरखेड तालुक्यातील १७ पैकी १६ जागा जिंकल्याचा दावा केला आहे. आम आदमी पार्टी तसेच मनसेनेही काही जागा जिंकल्याचे म्हटले आहे. त्यामुळे संभ्रमात अधिकच भर पडली आहे. 

प्रत्येक पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविली होती. महाविकास आघाडीची एकत्रित आकडेवारी बघितल्यास ९३ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात महाघाडीचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट होते. या आकडेवारीनुसार भाजपच्या वाट्याला फक्त ३४ जागा येतात. बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालेले नाही. अपक्षांनीसुद्धा मुसंडी मारली आहे. त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. सरपंचाच्या निवडणुकीनंतर कुठल्या पक्षाचे वर्चस्व राहील, हे स्पष्ट होणार आहे. 

दावे-प्रतिदावे
काँग्रेस : ८३ 
राष्ट्रवादी : १४ 
भाजप : ७३ 
शिवसेना : ०५ 

काँग्रेसतर्फे सर्व उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली होती. प्रचारासाठी पत्रकेही छापण्यात आली होती. तोपर्यंत भाजपने कुठलाच आक्षेप घेतला नाही. त्यानुसार सर्वाधिक जागा काँग्रेसने जिंकल्याचे स्पष्ट होते. जेथे पराभव झाला, तो आम्ही मान्य केला. आता भाजप आमच्या काही विजयी उमेदवारांवर दावा करून खोटे बोलत आहे. 
राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस. 

भाजपने ७३ ग्राम पंचायतीमध्ये स्पष्ट बहुमत मिळवले आहे. आणखी काही ग्रामपंचायतींमध्ये अपक्षांच्या सहकार्याने भाजपचा झेंडा फडकणार आहे. आम्ही एकटे लढलो. विरोधकांनी महाआघाडी केली होती. आता कोणीही कितीही दावे केले तरी नागपूर जिल्ह्यात भाजपनेच वर्चस्व निर्माण केले आहे. 
अरविंद गजभिये, जिल्हाध्यक्ष, भाजप.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख