रेड्डींचे निलंबन म्हणजे केवळ ढोंग, सहआरोपी करून अटक करा... - reddys suspension is just a pretense arrest him as a co accused | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

रेड्डींचे निलंबन म्हणजे केवळ ढोंग, सहआरोपी करून अटक करा...

अरुण जोशी
गुरुवार, 1 एप्रिल 2021

दीपाली चव्हाण यांनी त्यांना होत असलेल्या त्रासाबाबत वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत केले असल्याचे देखील पत्रात स्पष्ट नमूद केले आहे. दीपालीच्या सुसाईड नोट मध्ये देखील रेड्डी काहीच कारवाई करत नव्हते, असे स्पष्टपणे म्हटले आहे. मग रेड्डीवर थातूरमातूर स्वरूपाची केवळ बदलीची आणि निलंबनाची कारवाई का?

अमरावती : उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्यामुळे जगणे असह्य झाले असल्याचे वारंवार सांगूनही त्याकडे कानाडोळा करणाऱ्या आणि दीपाली चव्हाण यांच्या दुर्दैवी आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या अपर मुख्य वन संरक्षक एम. एस. रेड्डी यांना देखील सहआरोपी करून त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी आज भाजपाच्यावतीने अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा नेते डॉ. सुनील देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

२५ मार्च रोजी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली. तेव्हापासून मुख्य वनसंरक्षक एम.एस.रेड्डी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी समाजाच्या सर्वच स्तरांतून केली जात आहे. भाजपाच्यावतीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निदर्शने व आंदोलन करण्यात आले. मात्र, वन विभागातील आणि शासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रेड्डी यांना अभय मिळते आहे. वास्तविक पाहता दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात अपर मुख्य वनसरंक्षक एम. एस. रेड्डी दोषी नव्हते तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच असलेल्या वनखात्याने रेड्डीची २६ मार्च रोजीच तडकाफडकी बदली का केली, असा सवाल यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

दीपाली चव्हाण यांनी त्यांना होत असलेल्या त्रासाबाबत वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत केले असल्याचे देखील पत्रात स्पष्ट नमूद केले आहे. दीपालीच्या सुसाईड नोट मध्ये देखील रेड्डी काहीच कारवाई करत नव्हते, असे स्पष्टपणे म्हटले आहे. मग रेड्डीवर थातूरमातूर स्वरूपाची केवळ बदलीची आणि निलंबनाची कारवाई का? रेड्डी यांना सहआरोपी का करण्यात आले नाही? रेड्डी जर दोषी नाहीत तर त्यांनी अचलपूर न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धाव का घेतली? असे प्रश्‍न शिवराय कुळकर्णा यांनी उपस्थित केले आहेत. न्यायालयाने देखील त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. अटकेतील आरोपी विनोद शिवकुमार यास इतर आरोपींशिवाय व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली.

हेही वाचा : सात शिक्षक मृत्युमुखी पडले असतानाही सोपवले कोरोनाचे काम, अनेक बाधित...

अमरावती व धारणी पोलिसांनी रेड्डीला आरोपी न करण्याच्या दिशेनेच व उद्देशाने तपास केला, अशी भावना समाजात निर्माण झाली असल्याचे यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी आणि अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे देखील सर्वत्र सांगितले जात आहे. त्यामुळे दीपालीला न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास व्हावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दीपालीला न्याय मिळवून देण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली तर कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल व त्यासाठी सर्वस्वी पोलीस खाते जबाबदार राहील, असा इशारा भाजपतर्फे देण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास पाटील इंगोले, जिल्हा सरचिटणीस राजेश पाठक, स्वप्नील भुयार, अजिंक्य वानखडे, वैभव शिंगणे, अभिजित वानखडे उपस्थित होते.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख