प्रफुल्ल पटेल गुरुवारी नागपुरात घेणार बैठक, शहराध्यक्ष बदलणार ?  - praful patel to hold meeting in nagpur on thursday will the city president change | Politics Marathi News - Sarkarnama

प्रफुल्ल पटेल गुरुवारी नागपुरात घेणार बैठक, शहराध्यक्ष बदलणार ? 

राजेश चरपे 
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

काही पक्षाबाहेरील नेत्यांशीसुद्धा त्यांनी चर्चा केली असल्याचे समजते. देशमुख, पटेल आणि जैन यांची ज्या नावावर सहमती होईल, तोच शहराचा अध्यक्ष होणार आहे. ग्रामीणमध्ये मात्र अनिल देशमुख आणि माजी मंत्री रमेश बंग यांच्यात अध्यक्षाच्या नावावरून मतभेद असल्याचे समजते.

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शहरअध्यक्ष बदलण्यावरुन बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू आहेत. राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक दुनेश्‍वर पेठे यांनी शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या विरोधात ज्येष्ठ नेत्यांकडे तक्रारीदेखील केल्या आहेत. येत्या गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी नागपूर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असल्याने राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचे त्याकडे लक्ष लागले आहे. अद्याप बैठकीचा अजेंडा आणि स्थळ निश्चित व्हायचे असले तरी शहराध्यक्षाची निवड यात होईल, असा तर्क लावल्या जात आहे. 

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांना बदलवण्यासाठी अनेक दिवसांपासून हालचाली सुरू आहेत. आधी लोकसभा, नंतर विधानसभेची निवडणूक असल्याने प्रदेशाध्यक्षांनी सर्वांना सबुरीचा सल्ला दिला होता. आता दोन्ही निवडणुका आटोपल्या आहेत. त्यामुळे नव्या कार्यकारिणीच्या मागणीने पुन्हा उचल खाल्ली आहे. विद्यमान अध्यक्ष अहीरकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक दुनेश्वर पेठे यांनी दंड थोपटले होते. गृहमंत्री अनिल देशमुख आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीसुद्धा त्यांनी भेट घेतली होती. मात्र वरिष्ठांनी त्यांना शांत बसवले होते. 

किमान आतातरी अध्यक्ष बदला, अशी मागणी त्यांनी रेटून धरली आहे. त्यामुळे संभाव्य अध्यक्षाच्या नावावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. राज्यात महाआघाडीची सत्ता आहे. उपराजधानीला राष्ट्रवादीने गृहमंत्री दिला आहे. महापालिकेची निवडणूकसुद्धा जवळ आहे. त्यामुळे पक्षविस्तारासाठी ही एक चांगली संधी आहे. राष्ट्रवादीला आतापासूनच शहरात सक्रिय केल्यास आजवर महापालिका निवडणुकीचे अपयश पुसून काढता येऊ शकते. त्यादृष्टीने एखाद्या आक्रमक नेत्याला अध्यक्ष करावे, अशी मागणी केली जात आहे. 

नवा अध्यक्ष कोणाच्या गोटातील? 
नागपूर जिल्ह्यात अध्यक्ष निवडायचा असेल तर गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारणा केली जाते. त्यामुळे देशमुख यांच्याच गोटातील नवा अध्यक्ष राहील, असाही कयास लावला जात आहे. शहराचे निरीक्षक म्हणून प्रफुल पटेल यांचे कट्टर समर्थक राजेंद्र जैन यांची अलीकडेच नियुक्ती केली आहे. त्यांनीही अध्यक्ष बदलण्याचे संकेत यापूर्वी दिले आहे. तसेच काही पक्षाबाहेरील नेत्यांशीसुद्धा त्यांनी चर्चा केली असल्याचे समजते. देशमुख, पटेल आणि जैन यांची ज्या नावावर सहमती होईल, तोच शहराचा अध्यक्ष होणार आहे. ग्रामीणमध्ये मात्र अनिल देशमुख आणि माजी मंत्री रमेश बंग यांच्यात अध्यक्षाच्या नावावरून मतभेद असल्याचे समजते.     (Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख