‘त्यांना’ जनतेनेच उत्तर दिले, आमदार मिटकरींचा प्रतिटोला.. - the people answered them mla mitkaris counter attack | Politics Marathi News - Sarkarnama

‘त्यांना’ जनतेनेच उत्तर दिले, आमदार मिटकरींचा प्रतिटोला..

जयेश गावंडे
सोमवार, 18 जानेवारी 2021

मिटकरी यांचे हे मुळ गाव असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. आमदार रणधीर सावरकर यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. मिटकरींनी कुटासा गावाच्या निवडणुकीत सर्व 13 जागांवर उमेदवार उभे केले होते. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलशिवाय इतर तीन पॅनलही रिंगणात होते.

अकोला : जिल्ह्यातील कुटासा ग्रामपंचायतीमध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मिटकरी गटाने 13 पैकी 11 जागांवर विजय मिळवला. जनतेमधून कसं निवडून येतात, हे आव्हान ज्यांनी दिल होतं, त्यांना जनतेने उत्तर दिल्याचा प्रतिटोला मिटकरींनी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांना ‘सरकारनामा’शी बोलताना लगावला.  

‘गेल्या सहा वर्षांपासून मतदारसंघांमध्ये दिवसाही न फिरणारी मंडळी मी रात्री माझ्या मित्राच्या घरी भेटायला काय गेलो, एकदम तुटून पडली. जनतेमधून कसे निवडून येतात.’, हे आव्हान ज्यांनी दिलं होतं त्यांना जनतेनेच उत्तर दिलेल आहे. त्यामुळे त्या विधानावर भाष्य करावं, असं मला वाटत नाही आणि याला फारसं गांभीर्यानं घेणे गरजेचे वाटत नाही, असे आमदार मिटकरी म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला एक हाती सत्ता मिळवून देत भाजपा किती निष्क्रिय पक्ष आहे हे कुटासावासीयांनी दाखवून दिल्याचेही ते म्हणाले. 

अकोला जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या अकोट तालुक्यातील कुटासा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने 13 पैकी 10 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे. आमदार झाल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत बाजी मारली.

मिटकरी यांचे हे मुळ गाव असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. आमदार रणधीर सावरकर यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. मिटकरींनी कुटासा गावाच्या निवडणुकीत सर्व 13 जागांवर उमेदवार उभे केले होते. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलशिवाय इतर तीन पॅनलही रिंगणात होते. यात काँग्रेसचा देशमुख गट आणि भाजपचा विजयसिंह सोळंके यांचा गट, वंचित बहुजन आघाडी, युवक काँग्रेसचा कपील ढोके गट आणि शिवसेनेच्या संतोष जगताप यांचेही पॅनल रिंगणात होते. 

गावात एकूण 46 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने मोठी चुरस पाहायला मिळाली. चुरशीच्या लढतीत मिटकरी यांच्या पॅनेलने बाजी मारली. इतर पक्षाच्या पॅनेलमधील उमेदवारांना धूळ चारत त्यांनी 13 पैकी 10 जागा जिंकल्या आहेत. जनतेतून निवडूण न आलेल्या मिटकरी यांना ग्रामपंचायत निवडणुकीत धडा मिळेल, अशी टीका त्यांच्यावर होत होती. पण मिटकरी यांनी एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना धूळ चारली आहे. आमदार झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच निवडणुक होती. त्यामुळे जिल्ह्यासह संपुर्ण राज्याचे लक्ष या निवडणूकीच्या निकालाकडे लागले होते.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख