फडणवीस रवी राणांच्या कार्यक्रमाला गेले अन् भाजप पदाधिकारी झाले नाराज
Opposition Leader Devendra Fadnavis in Ravi Ranas program

फडणवीस रवी राणांच्या कार्यक्रमाला गेले अन् भाजप पदाधिकारी झाले नाराज

राणा यांनी या भेटीचं भांडवल केल्यानं भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या हे पचनी पडलेले नाही.

अमरावती : आमदार रवी राणा यांच्याविषयी भाजपमध्ये नाराजी असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस थेट त्यांच्या कार्यक्रमात पोहचले. विशेष म्हणजे फडणवीसांच्या दौऱ्याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही माहिती नव्हती. राणा यांनी या भेटीचं भांडवल केल्यानं भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या हे पचनी पडलेले नाही. फडणवीसांनी त्यांनाच महत्त्व दिल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. (Opposition Leader Devendra Fadnavis in Ravi Ranas program)

फडणवीस यांचे मामेभाऊ अनिरुद्ध कलोती यांचे निधन झाल्याने कलोती कुटुंबीयांना सांत्वन भेटीसाठी ते सोमवारी अमरावतीत आले होते. त्यांचा हा शासकीय दौरा नसल्याने त्याबाबतची फारशी माहिती भाजप पदाधिकाऱ्यांना नव्हती. कलोती कुटुंबीयांच्या सांत्वनानंतर फडणवीस थेट अपक्ष आमदार रवी राणा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहिले. 

सुमारे ४५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या राजापेठ रेल्वे उड्डाणपूल व भुयारी मार्गाची फडणवीस यांनी पाहणी केली. राणा यांच्यासह युवा स्वाभिमानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या दौऱ्याचे राणा यांनी चांगलेच भांडवल केले असून सोशल मीडियातून छायाचित्र प्रसिध्द केली आहेत. 

ही छायाचित्र बघूनच फडणवीस अमरावतीत आल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांना समजले. फडणवीस हे आपल्या शहरात येऊनही त्याबाबत साधी कुणकूणही लागत नाही, याबाबत पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. पण त्याचवेळी फडणवीस हे रवी राणा यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानं हे भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या पचनी पडलेले नाही.
 
महापालिकेतील भाजपचे पक्षनेते तुषार भारतीय यांनी फडणवीसांच्या दौऱ्याची कोणतीही सूचना मिळाली नसल्याचे सांगितले. फडणवीस यांचा हा खासगी दौरा असल्याने त्यांना भेटायला जाऊ शकलो नाही, अशी महापौर चेतन गावंडे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्याशी भाजपची जवळीक खूपच वाढली आहे. राणी पती-पत्नीकडून सतत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं जातं. तर मोदी सरकारचं कौतूक करताना ते थकत नाहीत. त्यामुळे फडणवीस यांच्या पाहणी दौऱ्यावरून शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असल्याची चर्चा आहे.

Related Stories

No stories found.