मनसेच्या यशाची विदर्भातील एकच आठवण : उंबरकरांनी वणीत बसविलेला जम

यवतमाळ जिल्ह्याच्या वणी नगरपरिषदेवर सन २०१५ मध्ये मनसेची सत्ता होती. तेव्हा नगराध्यक्ष एक जिल्हा परिषद सदस्य आणि एक पंचायत समिती सदस्य मनसेचा निवडून आला होता.
Raj Thackeray - Raju Umbarkar
Raj Thackeray - Raju Umbarkar

नागपूर : शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा, असे म्हणत राज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. त्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या त्यांच्या पहिल्या सभेची राज्यभर चर्चा झाली. मुंबई, पुणे आणि नाशिक येथे पक्षाला यशही मिळाले, ते पुढे टिकू शकले नाही हा भाग वेगळा. पण विदर्भात हा पक्ष आजतागायत पाहिजे तशी छाप पाडू शकलेला नाही. 

नाही म्हणायला, यवतमाळ जिल्ह्याच्या वणी नगरपरिषदेवर सन २०१५ मध्ये मनसेची सत्ता होती. तेव्हा नगराध्यक्ष एक जिल्हा परिषद सदस्य आणि एक पंचायत समिती सदस्य मनसेचा निवडून आला होता. पण त्यानंतर मात्र येथे मनसेला एकहाती सत्ता मिळवता आली नाही. एकंदरीत विदर्भाचा विचार केला तर, राज ठाकरेंचा पक्ष येथे आपला ठसा उमटवू शकला नाही. २००६ पासून अनेक कार्यकर्ते मनसेसोबत जुळले. पक्षात नेतेही तयार झाले. पण संघटन टिकवून ठेवण्याची कला मनसेच्या विदर्भातील एकाही नेत्याला जमली नाही. यवतमाळ जिल्ह्यातील वणीचा अपवाद सोडता इतर कुठल्याही जिल्ह्यात मनसेने सत्ता मिळविल्याचे ऐकिवात नाही. 

विदर्भात वणी ठरला बालेकिल्ला...
विदर्भात पहिल्यांदा मनसेला यश मिळाले ते यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद आणि वणीमध्ये. वणीत राजू उंबरकर नावाचा कार्यकर्ता पक्षासोबत जुळला. जिल्हा कार्यकारिणीत सचिव पदापासून कामाला सुरूवात करून उंबरकर आज प्रदेश उपाध्यक्ष आहेत. रुग्ण सेवा केंद्रापासून वणीत पक्षाच्या कामाला सुरूवात झाली, तेथून आज पक्षाच्या १५ व्या वर्धापन दिनी ग्रामीण रुग्णालयात राज विश्रांती कक्ष स्थापन करेपर्यंत त्यांचा प्रवास आलेला आहे. दरम्यानच्या काळात त्यांच्या परीने त्यांनी जमेल तसे काम करून पक्ष मोठा केला. २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये ते विधानसभेची निवडणूक लढले. राज ठाकरे त्यांच्या प्रचारसभेलादेखील आले. पण प्रत्येक वेळी आमदारकीने त्यांना हुलकावणी दिली. पण राज ठाकरेंच्या विचारांवर आजही पक्षसंघटनेच्या कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. 

सत्ता नसलेला पण पॉवरफुल्ल नेता...
मनसेची स्थापना केल्यानंतर राज्यात राज ठाकरे कधीच सत्तेत आले नाही. पण सभांमध्ये त्यांच्या भाषणांची जादू आजही कायम आहे. त्यांचे भाषण ऐकायला तुफान गर्दी होते. त्यांच्या बोलण्याची राज्यातच नव्हे तर देशपातळीवर दखल घेतली जाते. त्यामुळे सत्ता नसलेला, पण पॉवरफुल्ल नेता, असे त्यांच्याबाबतीत म्हटले जाते. मनसेला बऱ्यापैकी यश मिळणे सुरू झाले असताना मोदी लाट आली. तसेही आपल्या देशातील राजकारणात लाटेसमोर कुणाचेच काही चालत नाही. या लाटेत राज्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससारखे पक्ष त्या काळी वाहून गेले. तेथे मनसेचा निभाव लागणारच नव्हता. राज ठाकरेंनी तयार केलेले महापौर, नगराध्यक्ष, आमदार यांना कार्यकर्ते सांभाळता आले नाही. त्यामुळेच संघटनात्मक वाढ झाली नाही. पण राज ठाकरेंना मानणारा आश्‍वस्थ युवा कार्यकर्ता आजही पक्षात आहे आणि राज ठाकरेंची जादूही कायम आहे. त्यामुळे चमत्कार केव्हाही होऊ शकतो, असा विश्‍वास कार्यकर्ते व्यक्त करतात.  

निष्ठावान कार्यकर्ते आजही तयारीत...
राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाचे, त्यांच्या भाषणाच्या आकर्षणामुळे युवा कार्यकर्ता त्यांच्याकडे वळला. अनेकांना पदे मिळाली, त्यानंतर मनसेचे काही नेते पक्ष सोडून गेले. पण निष्ठावान कार्यकर्ता आजही राज ठाकरेंच्या दिमतीला उभा आहे. कोविडच्या काळातही त्यांच्या आदेशावरून प्रत्येक मनसैनिक रस्त्यावर लोकांच्या सेवेत होता. त्या संकटाच्या काळात कृष्णकुंजचे दरवाजे वारकऱ्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी खुले होते. आज राज यांचे विचार राज्याला पटत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राज्यात कुणी चमत्कार करू शकेल, तर ते फक्त आणि फक्त राज ठाकरेच, असा विश्‍वास मनसैनिकांना आहे. अखेरच्या श्‍वासापर्यंत मनसैनिक, राजसैनिक म्हणूनच काम करू आणि मरतानाही पक्षाचा झेंडाच सोबत घेऊन जाऊ, या विचारांचा कार्यकर्ता आजही राज ठाकरेंसोबत आहे, त्यामुळे येणार काळ हा मनसेचाच, असे मनसैनिक आत्मविश्‍वासाने सांगतात.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com