संजय राठोडांना पुन्हा शक्तिप्रदर्शन करणे तर भोवत नाहीये ना…?

आमदार राठोड यांनी माध्यमांसमोर येऊन सदर आरोपाचे खंडण केले. पण विशेष तपास पथक घाटंजीत तळ ठोकून होते. आणखी पुरावे गोळा केले जात आहेत.
Sanjay Rathore - Uddhav Thackeray
Sanjay Rathore - Uddhav Thackeray

नागपूर : पुणे येथे पुजा चव्हाणच्या Pooja Chavan झालेल्या मृत्यूनंतर माजी मंत्री व यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस-दारव्हा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड Former Minister and Digras-Darwha's MLA Sanjay Ratore यांच्या अडचणी कुठेही कमी होताना दिसत नाहीये. आताशा ते राजकारण व समाजकारणात रुळू लागले असले तरी त्यांचे गेलेले मंत्रिपद अजूनही त्यांच्यापासून कोसो दूर असल्यासारखे दिसत आहे. ते परत मिळविण्यासाठी ते सातत्याने आणि संधी मिळेल तेव्हा शक्तिप्रदर्शन करताना दिसतात. हेच शक्तिप्रदर्शन करणे तर त्यांना भोवत नाहीये ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. 

पुणे येथे वानवाडी येथे घडलेल्या त्या घटनेनंतर अनेक दिवस ‘अंडरग्राऊंड’ राहिलेल्या राठोडांनी नंतर पोहरादेवी येथे कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवत जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्याही वेळी त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टिका झाली होती. पण त्यानंतर राठोडांना मंत्रिपद मिळावे, यासाठी अनेकांनी मखलाशी केल्याचेही पुढे आले होते. त्याचा उपयोग मात्र झाला नाही, ही बाब अलाहिदा. त्यानंतर आमदार राठोडांनी दुसरा प्रयत्न सुरू केला, तो म्हणजे राज्यभराचा दौरा. या दौऱ्यातून त्यांनी राज्यभरातील बंजारा समाज एकत्रित करण्याचे काम केले. हे सर्व ते दबाव निर्माण करून गेलेले मंत्रिपद परत मिळविण्यासाठी करत आहेत, ही बाब पक्षातील चाणाक्षांच्या नजरेतून सुटलेली नाही. 

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणून मंत्रिपद परत पदरात पाडून घेणे, हे एकमेव काम राज्य दौऱ्यातून ते करीत असल्याचे सांगितले जाते आणि नेमकी हीच बाब मुख्यमंत्र्यांना पटली नसल्याचीही माहिती आहे. एक आमदार राज्यभर फिरून स्वतःसाठी संघटन तयार करीत असेल, तर ते पक्षासाठीही निश्‍चितच चांगले नाही. कारण राठोडांनी पायाला चक्री लावून राज्य पिंजून काढले तर ते पक्षासाठी नव्हे, तर स्वतःसाठी असे मानणारा एक वर्ग पक्षात तयार होत आहे. त्यांना पक्षच जर वाढवायचा होता, तर मंत्री असेपर्यंत ते संघटन वाढविण्यासाठी का नाही फिरले, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. 

राठोडांनी येवढे सगळे करूनही मंत्रिपद त्यांना परत मिळाले नाही, तर माझ्या पाठीशी समाज आहे आणि माझे राज्यभर संघटन आहे. त्यामुळे मी दुसऱ्या पक्षात जाऊन सेनेला खिंडार पाडू शकतो, असा संदेश तर आमदार राठोड देत नाहीयेत ना, असाही प्रश्‍न अनेकांना सतावतो आहे. आमदार राठोडांप्रमाणे शिवसेनेचे कुणीही नेते याप्रमाणे राज्यभर अद्याप फिरलेले नाहीत. त्यामुळे मंत्रिपद परत न मिळाल्यास आमदार राठोड स्वतंत्र पक्ष काढण्याची तर तयारी करत नाहीयेत ना, अशीही एक शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘त्या’ प्रकरणातही कारवाईचा फास आवळला...
घाटंजी तालुक्यातील सेवानगर येथील एका महिलेने आमदार राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार बुधवारी (ता. ११) स्पीड पोस्टाने जिल्हा पोलिस अधीक्षक व ठाणेदार घाटंजी यांच्याकडे केली होती. शनिवारी (ता. १४) घाटंजी पोलिस ठाण्यात हजर राहून चौकशी पथकासमोर त्या महिलेने बयाण दिले. तब्बल अडीच तास बंद खोलीत बयाण नोंदविण्यात आले. या प्रकरणातही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तात्काळ एसआयटीचे गठण केले आणि कारवाईला वेग दिला. कारवाईत येवढी तत्परता म्हणजे या प्रकरणात राठोडांवर कारवाईचा फास आवळला जातोय, असे समजायला काही हरकत नसावी.  

ही बातमी पण वाचा : आमदार जोरगेवारांचे चार एक्के दे धक्के, तर भाजपचे २०० युनिट मोफतचे आंदोलन...
 
दरम्यान, आमदार राठोड यांनी माध्यमांसमोर येऊन सदर आरोपाचे खंडण केले. पण विशेष तपास पथक घाटंजीत तळ ठोकून होते. आणखी पुरावे गोळा केले जात आहेत. त्यासाठी तालुक्यातील पीडितेच्या मूळ गावी पथक जाऊन आले. भरोसा सेल, महिला बालकल्याण कक्ष व अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव दरणे यांनी पीडितेचे बयाण नोंदविले. एका आमदाराची चौकशी आणि पुरावे गोळा करण्याचे काम येवढ्या तातडीने करण्यामागे राठोडांनी दबावतंत्राचा वापर केल्याचे कारण असल्याचेही सांगितले जाते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com