Sarkarnama Exclusive नाना पटोले, नितीन राऊत राहुल गांधींना भेटले ते उपमुख्यमंत्रीपदासाठीच! - Nana Patole, Nitin raut meet rahul gandhi for demanding deputy chief minister for congress | Politics Marathi News - Sarkarnama

Sarkarnama Exclusive नाना पटोले, नितीन राऊत राहुल गांधींना भेटले ते उपमुख्यमंत्रीपदासाठीच!

अतुल मेहेरे
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

काॅंग्रेसला राज्यात समान वाटा मिळावा यासाठी प्रदेश नेत्यांनी आता केंद्रीय नेतृत्वाकडे आग्रह धरला आहे. 

नागपूर : नाना पटोले यांच्याकडे काॅंग्रेसची सूत्रे आल्यानंतर पक्ष आक्रमक होणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार पावले पडू लागली आहेत. नाना पटोले, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिल्लीमध्ये कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. दोघेही स्वतंत्रपणे राहुल गांधींना भेटले. पण मिळालेल्या माहितीनुसार काॅंग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी काॅंग्रेसतर्फे प्रयत्न करावा, असा आग्रह या बैठकीत राहुल गांधीकडे धरल्याचे सूत्रांनी सांगितले.

नाना पटोले हे राहुल गांधींजी भेट घेऊन निघाले आणि त्यानंतर राऊत हे भेटायला आले. दोघांनीही स्वतंत्रपणे आपली मते राहुल यांना सांगितल्याचे कळते. विधानसभेचे अध्यक्षपद सध्या काॅंग्रेसकडे आहे. ते पक्षाकडेच राहणार, असे पटोले यांनी या आधी सांगितले आहे. तर महाविकास आघाडीतील इतर नेत्यांने हे पद खुले असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे काहीतरी बदल होणार असल्याचे बोलले जात होते. त्यानुसार आजच्या भेटीनंतर याबाबत राजकीय घडामोडी वेगवान होण्याची शक्यता आहे.  

महाराष्ट्राच्या इतिहासात एकाच वेळी दोन उपमुख्यमंत्री आजतागायत राहिलेले नाहीत. पण यावेळी तसे झाल्यास इतिहासात ही पहिली वेळ असेल. नाना पटोले यांना मंत्रीपद द्यायचे की नाही यावरही या बैठकीत खल झाला. पटोले यांच्यानंतर राऊत हे राहुल गांधींना भेटल्याने या दोघांतील पदात काही बदल होणार की काय, अशी चर्चा सुरू झाली. 

दिल्लीला येणे- जाणे नेहमीचेच : डॉ. नितीन राऊत
मी अनुसूचित जाती मोर्चाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यामुळे बैठकांसाठी आणि मोर्चाच्या कामांसाठी माझे नेहमीच दिल्लीला येणेजाणे असते. आजही मी नियमित कामांसाठी दिल्लीला गेलो होतो. तेव्हा मी आमचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणावरही चर्चा झाली. नेत्यांची भेट झाली की नियमित कामांव्यतिरिक्त राजकारणावर चर्चा ही होतेच. पण त्यामध्ये उपमुख्यमंत्रीपदाचा किंवा विधानसभा अध्यक्षपदाच्या मुद्यांचा समावेश नव्हता, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.

आजच नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राहुल गांधींना भेटले आणि तुम्हीसुद्धा आजच त्यांची भेट घेतली. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरू झाली, असे विचारले असता, डॉ. राऊत म्हणाले, नाना पटोले आणि मी एकाच वेळी तेथे होतो. राहुलजींना ते आधी भेटले आणि त्यानंतर मी भेटलो. पण या भेटींचा सुरू असलेल्या चर्चांशी काही एक संबंध नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख